Latur: तपघाले खून प्रकरणातील दोषी पोलिसांना सेवेतूनच बडतर्फ करा, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मागणी
By हणमंत गायकवाड | Published: June 15, 2023 09:35 PM2023-06-15T21:35:03+5:302023-06-15T21:35:26+5:30
Ramdas Athawale: या खून प्रकरणातील दोषी असलेल्या संबंधित पोलिसांना सेवेतूनच बडतर्फ करावे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी येथे केली.
- हणमंत गायकवाड
लातूर - रेणापूर येथील गिरिधारी तपघाले यांची हत्त्या झाली. या प्रकरणात गुन्हा नोंदविताना पोलिसांची कर्तव्य तत्परता दिसून न आल्याने तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले आणि तिघांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. मात्र या खून प्रकरणातील दोषी असलेल्या संबंधित पोलिसांना सेवेतूनच बडतर्फ करावे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी येथे केली.
रेणापूर येथे जाऊन तपघाले कुटुंबियांची गुरुवारी रात्री साडेआठ वाजता सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी भेट घेतली. यावेळी ते म्हणाले, गिरिधारी तपघाले यांचा खून जातीयवादातून झालेला आहे. तपघाले कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी. तपघाले कुटुंबातील एकाला शासकीय सेवेत घ्यावे. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे, यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊ. तपघाले कुटुंबाला न्याय देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे भूमिका मांडू, असेही सामाजिक न्यायमंत्री आठवले म्हणाले.
यावेळी शासकीय अधिकारी तसेच रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय सरचिटणीस चंद्रकांत चिकटे, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे, देविदास कांबळे, सुनील वाहुळे, राजेंद्र कांबळे, बालाजी आचार्य, उत्तम कांबळे आदी कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
पक्षाच्या वतीने दोन लाखाची मदत....
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तपघाले कुटुंबाला दोन लाखाची मदत जाहीर करण्यात आली. त्यापैकी काही रक्कम यापूर्वीच देण्यात आली होती. उर्वरित मदत निधी आठवले यांचे हस्ते तपघाले कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आला.