शिक्षण मंत्र्यांना मिरच्यांचा धूर; एनएसयूआयचे अनोखे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 06:39 PM2019-01-07T18:39:39+5:302019-01-07T19:13:23+5:30
उच्च शिक्षणाच्या अनुषंगाने प्रश्न करणा-या विद्यार्थ्यांना अटक करण्याचे आदेश शिक्षणमंत्र्यांनी दिले, त्याच्या निषेधार्थ एनएसयूआयच्या वतीने शिक्षण मंत्र्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेस मिरच्याचा धूर देण्यात आला.
लातूर - उच्च शिक्षणाच्या अनुषंगाने प्रश्न करणा-या विद्यार्थ्यांना अटक करण्याचे आदेश शिक्षणमंत्र्यांनी दिले, त्याच्या निषेधार्थ एनएसयूआयच्या वतीने शिक्षण मंत्र्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेस मिरच्याचा धूर देण्यात आला. सोमवारी दयानंद गेटसमोर झालेल्या या अनोख्या आंदोलनात एनएसयुआयचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अमरावती येथील शिवाजी शिक्षण संस्थेत काही विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात शिक्षणमंत्र्यांना प्रश्न केले. मोफत उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध करून देता येईल का, हा प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारला व त्याचे चित्रिकरण केले. त्यामुळे शिक्षण मंत्र्यांनी ‘तुला झेपत नसेल तर शिकू नको, नोकरी कर’ असे अफलातून उत्तर दिले. शिवाय, चित्रिकरण करणा-या विद्यार्थ्यांना अटक करा, असे आदेश दिले. त्याच्या निषेधार्थ एनएसयुआयने आज लातूरमध्ये मिरच्याचा धूर देऊन या घटनेचा निषेध नोंदविला.
विद्यार्थी हा देशाच्या भवितव्याचा कणा आहे. हा कणा मोडण्याचा प्रयत्न शिक्षण मंत्री व सरकार करीत आहे. अभ्यासक्रमातून जाणूनबुजून पाठ्यपुस्तकामध्ये चुकीचे मजकूर छापले जातात. इतिहास बदलण्याचा त्यांचा डाव आहे. ही पद्धत हुकूमशाहीकडे वाटचाल करणारी आहे. म्हणून एनएसयुआयने शिक्षणमंत्र्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेस मिरच्याचा धूर देत अनोखे आंदोलन केले.
या आंदोलनात एनएसयुआयचे शहर जिल्हाध्यक्ष शरद देशमुख, शहराध्यक्ष रोहित पाटील, निखिल लोकरे, इम्रान सय्यद, ऋषी मोरे, सूरज पाटील, परमेश्वर घुटे, शुभम चव्हाण, किरण देशमुख, विशाल इरळे आदींचा समावेश होता.
अनोखे आंदोलन... एनएसयुआयच्या वतीने शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या वक्तव्याचा सोमवारी लातुरात निषेध करण्यात आला. शिक्षण मंत्र्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेस मिरच्याचा धूर देऊन हे अनोखे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात एनएसयुआयचे शहर जिल्हाध्यक्ष शरद देशमुख, शहराध्यक्ष रोहित पाटील, निखिल लोकरे, इम्रान सय्यद, ऋषी मोरे, सूरज पाटील, परमेश्वर घुटे, शुभम चव्हाण, किरण देशमुख, विशाल इरळे आदींचा समावेश होता.