अवकाळीने लातूरातील १३ मंडळांना झोडपले; ऊस-ज्वारीस फटका, पिकांवर रोगाची भीती

By हरी मोकाशे | Published: November 29, 2023 05:51 PM2023-11-29T17:51:56+5:302023-11-29T17:55:06+5:30

तूर, हरभरा, फळबागा, भाजीपाल्यावर रोगाच्या प्रादुर्भावाची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

unseasonal rain hits 13 revenue mandals in Latur; Sugarcane-Jwari crop loss, fear of disease on crops | अवकाळीने लातूरातील १३ मंडळांना झोडपले; ऊस-ज्वारीस फटका, पिकांवर रोगाची भीती

अवकाळीने लातूरातील १३ मंडळांना झोडपले; ऊस-ज्वारीस फटका, पिकांवर रोगाची भीती

लातूर : जिल्ह्यातील १३ महसूल मंडळांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले. त्यामुळे ऊसासह ज्वारीच्या पिकास फटका बसला आहे. तसेच तूर, हरभरा, फळबागा, भाजीपाल्यावर रोगाच्या प्रादुर्भावाची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. गेल्या २४ तासांत सरासरी ३१.४ मिमी पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. हवामान विभागानेही अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तविली होती. मंगळवारी पहाटे काही भागात अवकाळी पाऊस झाला. त्यानंतर सायंकाळी व रात्री वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसाने ऊसासह ज्वारीचे पीक आडवे झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तसेच तूर, हरभरा या पिकांसह भाजीपाला, फळबागांवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील औसा, मुरुड, भादा, भेटा, चापोली, डिगोळ, किनगाव, केळगाव या भागात जोरदार अवकाळी पाऊस झाला. दरम्यान, बुधवारी सकाळी ८ वा. पर्यंत गेल्या २४ तासांत ३१.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यात लातूर तालुक्यात ३५ मिमी, औसा- ४८.७, अहमदपूर- १०.९, निलंगा - १४.९, उदगीर- ३१.३, चाकूर- ३८.७, रेणापूर- ३२.७, देवणी- ६९.५, शिरुर अनंतपाळ २७.२, जळकोट तालुक्यात १२.८ मिमी पाऊस झाला आहे.

भादा मंडळात सर्वाधिक पाऊस...
औसा तालुक्यातील भादा महसूल मंडळात सर्वाधिक पाऊस झाला असून ९२.३ मिमी अशी नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ देवणी- ८२.३, पानचिंचोली- ७४, आष्टा- ६७.५, बोरोळ- ७७.३ मिमी पाऊस होत अतिवृष्टी झाली आहे. शिवाय, कासारखेडा मंडळात ५१.८, तांदुळजा- ५४.३, औसा- ६०, किनीथोट- ४९.५, उजनी- ५५.३, नळेगाव- ५२.५, मोघा- ५२.५, झरी मंडळात ५५.५ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे.

अवकाळीने ऊस तोडणी थांबली...
जिल्ह्यातील सहकारी व खाजगी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सध्या सुरु आहे. शेत- शिवारात ऊस तोडणीच्या मजुरांच्या टोळ्या व हार्वेस्टर दिसून येत आहेत. मंगळवारी रात्री व बुधवारी पहाटे झालेल्या अवकाळी पावसाने ऊस तोडणीवर परिणाम झाला आहे. वादळी वारा व अवकाळी पावसामुळे ऊसतोड मजुरांची तारांबळ उडाली होती.

Web Title: unseasonal rain hits 13 revenue mandals in Latur; Sugarcane-Jwari crop loss, fear of disease on crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.