लातूरात वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस, वीज पडल्याने शेतमजुराचा मृत्यू
By हरी मोकाशे | Published: May 16, 2024 06:48 PM2024-05-16T18:48:22+5:302024-05-16T18:49:27+5:30
औसा तालुक्यातील ताड तावशी येथील घटना
लातूर : शहरासह जिल्ह्यातील काही भागात गुरुवारी दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. दरम्यान, औसा तालुक्यातील ताड तावशी येथे वीज पडून एका शेतमजुराचा मृत्यू झाला.
बुधवारी एक दिवस विश्रांती घेतल्यानंतर गुरुवारी पुन्हा वादळी वाऱ्यासह शहराबरोबर काही भागात अवकाळी पाऊस झाला. धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील दिनकर किसन माने (६०) हे औसा तालुक्यातील ताड तावशी येथील शेतकरी सुजित देशपांडे यांच्या शेतात गुरुवारी काम करीत होते.
दरम्यान, दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरु झाला आणि वीज पडून शेतमजूर दिनकर किसन माने हे जागीच ठार झाले. या घटनेची माहिती प्रशासनास देण्यात आली आहे. याप्रकरणी भादा पोलिसांत नोंद करण्याचे काम सुरु होते. बेलकुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केले जाणार असल्याची माहिती सरपंच अर्जुन घाडगे यांनी दिली.