अडचणी शेतकऱ्यांची पाठ सोडेना, अवकाळी पावसाचा टोमॅटो पिकांना तिसऱ्यांदा फटका

By संदीप शिंदे | Published: May 22, 2023 06:37 PM2023-05-22T18:37:16+5:302023-05-22T18:38:03+5:30

टोमॅटो उत्पादनातुन मिळणारा फायदा तर मिळालाच नाही उलट लागवडीचा खर्च वाया गेला असल्याने शेतकरी मोठ्या सकंटात सापडले आहे.

Unseasonal rains hit tomato crops for the third time | अडचणी शेतकऱ्यांची पाठ सोडेना, अवकाळी पावसाचा टोमॅटो पिकांना तिसऱ्यांदा फटका

अडचणी शेतकऱ्यांची पाठ सोडेना, अवकाळी पावसाचा टोमॅटो पिकांना तिसऱ्यांदा फटका

googlenewsNext

शिरूर अनंतपाळ : अवकाळी पावसाने यंदा चांगलाच कहर केला असून, फळबाग उत्पादक शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. महिनाभरात तिसऱ्यांदा वादळी वाऱ्यासह गारपीट झाली असल्याने टोमॅटो बागेस फटका बसला आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे टाकले आहे.

शिरूर अनंतपाळ प्रकल्पाचा तालुका असल्याने तालुक्यात बागायतदार शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. अनेक शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देऊन भेंडी, मेथी, चवळी, दोडका, मटकी, काकडी, कोथिंबीर यासह टोमॅटोची लागवड करीत आहेत. यंदा टोमॅटोची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. तीन महिन्यापुर्वी लागवड केलेले टोमॅटो ऐन लग्नसराईत काढणीस येतील आणि त्यातुन चार पैसे मिळतील असे वाटत असतानाच महिनाभराच्या कालावधीत तिसऱ्यांदा वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीटीचा टोमॅटो बागेस फटका बसला असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत झाले आहेत. अनेकांच्या शेतात टोमॅटोचा सडा पडला आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादनातुन मिळणारा फायदा तर मिळालाच नाही उलट लागवडीचा खर्च वाया गेला असल्याने शेतकरी मोठ्या सकंटात सापडले आहे. खरीप हंगामाच्या पेरण्या कशा करायचे असा प्रश्र अनेक शेतकऱ्यांना पडला आहे.

तालुक्यात यंदा ४६ हेक्टर्सवर लागवड...
तालुक्यातील विविध गावात यंदा ४६ हेक्टर्सपेक्षा अधिक क्षेत्रावर टोॅमटोची लागवड करण्यात आली होती. परंतु महिनाभरात तिसऱ्यांदा वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी गारपीटीचा टोमॅटो बागेस फटका बसला असल्याने अनेकांच्या शेतात टोमॅटोचा सडा पडला असल्याचे धोंडीराम कारभारी, विठ्ठलराव पाटील, संजीव गुणाले, सदानंद पाटील यांनी सांगितले.

वाढत्या तापमानामुळे वाढ खुंटली...
एप्रिलच्या अखेरीपासुनच तापमानाचा पारा वाढत गेला असून, मे महिन्यात तर तापमान ४० अंशावर गेले असल्याने फळावर आलेल्या बागेत मोठ्या प्रमाणात फळगळती होत आहे. नवीन लागवड केलेल्या रोपट्यांची वाढ खुंटत असल्याचे तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण खताळ यांनी सांगितले.

शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी...
फळबाग उत्पादक शेतकरी यंदा मोठ्या अडचणीत आले असून, टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना महिनाभरात तिसऱ्यांदा वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी गारपीटीचा फटका बसला आहे. त्यामुळे नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमधून होत आहे.

Web Title: Unseasonal rains hit tomato crops for the third time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.