मराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी, वेशीवर ग्रामस्थांनी फलकच लावला
By संदीप शिंदे | Published: September 27, 2023 04:05 PM2023-09-27T16:05:19+5:302023-09-27T16:06:07+5:30
लातूर तालुक्यातील एकुरगा ग्रामस्थांचा निर्णय
बोरगाव काळे : मराठा समाजाला जोपर्यंत जनगणना करून आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना गावबंदीचा निर्णय एकुरगा येथील ग्रामस्थांनी घेतला आहे. याबाबत फलकाचे अनावरण ग्रामस्थांनी केले.
राज्यभर मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आंदोलने केली जात आहेत; परंतु शासन यावर ठोस निर्णय घेत नाही, असे ग्रामस्थांचे मत आहे. मराठा आरक्षण विषयी आमदार, खासदार बोलत नाहीत. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न गंभीरपणे घेतला जात नाही म्हणून एकुरगा ग्रामस्थांनी जोपर्यंत जातनिहाय जनगणना करून मराठा समाजाची लोकसंख्या निश्चित होत नाही व मराठा समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही पक्षाच्या लोकप्रतिनिधींना व त्यांच्या कार्यकर्त्यांना गावबंदी केल्याचा चक्क फलकच गावातील प्रवेशद्वाराजवळच लावला आहे.