UPSC आईचं अखेरचं स्वप्न लेकीने केलं साकार: लातूरच्या शुभाली परिहार-परदेशींचा ४७३ वा रँक

By संदीप शिंदे | Published: May 23, 2023 07:43 PM2023-05-23T19:43:40+5:302023-05-23T19:45:04+5:30

लातूरची कन्या अन् अहमदनगरच्या सुनेने केले आईचे स्वप्न पूर्ण; आयपीएस होण्याची जिद्द

UPSC Result: Mother's last dream came true: Latur's Shubhali Parihar-Paradeshi got 473rd rank in UPSC 2023 | UPSC आईचं अखेरचं स्वप्न लेकीने केलं साकार: लातूरच्या शुभाली परिहार-परदेशींचा ४७३ वा रँक

UPSC आईचं अखेरचं स्वप्न लेकीने केलं साकार: लातूरच्या शुभाली परिहार-परदेशींचा ४७३ वा रँक

googlenewsNext

लातूर : लातूरची कन्या अन् अहमदनगरची सून शुभाली परिहार-परदेशी यांनी आईचे स्वप्न पूर्ण करीत युपीएससी परीक्षेत देशात ४७३वा रँक मिळविला आहे. मुलींनी शिकून अधिकारी व्हावे, अशी इच्छा असणाऱ्या आई संगीता यांचे कर्करोगाने पाच वर्षांपूर्वी निधन झाले. अन् आईने समोर ठेवलेला शिक्षणाचा विचार अंमलात आणत शुभाली यांनी गुणवत्तेचे शिखर गाठले.

शुभाली लक्ष्मीकांत परिहार या मूळच्या औसा तालुक्यातील राष्ट्रीय सेवाग्राम (चलबुर्गा) येथील असून, त्यांचे शालेय शिक्षण श्री देशिकेंद्र विद्यालयात व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण राजर्षी शाहू महाविद्यालयात पूर्ण झाले. पुढे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळविल्यानंतर शुभाली यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी केली. एमपीएससीमध्ये त्या यशस्वी झाल्या आणि लातूर येथेच राज्य कर निरीक्षकपदी नियुक्ती मिळाली. त्यानंतरही युपीएससीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या नोकरी करीत अभ्यास करीत होत्या. नोकरी करीत दररोजचा आठ तासांचा अभ्यास हा ध्यास बाळगत यश मिळविले.

सेवाग्रामधील पहिली पदवीधर...
राष्ट्रीय सेवाग्राम (चलबुर्गा) हे जाती-पातीच्या भिंती नसलेले गाव आहे. भूकंपानंतर तत्कालीन कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या संकल्पनेतून विविध जाती-जमातीची घरे पारंपरिकपणे वेगवेगळ्या ठिकाणी न बांधता विद्यापीठांतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी एकात्मतेची पायाभरणी केली होती. त्याच संस्कारात शुभाली सेवाग्राममधील पहिल्या पदवीधर झाल्या. त्यांनी विवाहांमधील प्रथा बाजूला ठेवून नोंदणी पद्धतीने विवाह केला. त्या म्हणाल्या, ग्रामीण भागात अथवा प्रतिकूल स्थितीतही मुली उत्तुंग यश मिळवू शकतात. त्यामुळे आई-वडिलांनी मुलांना अनुकूल वातावरण द्यावे. आजवर माझ्या पाठीशी असलेली आई संगीता, वडील लक्ष्मीकांत परिहार, सासू विद्या परदेशी, सासरे शंकरसिंग परदेशी (रा. चिखली, ता. श्रीगोंदा) आणि छत्तीसगडमध्ये आयएफएस असणारे पती चंद्रशेखर परदेशी यांचा मोलाचा वाटा आहे, असेही शुभाली म्हणाल्या.

Web Title: UPSC Result: Mother's last dream came true: Latur's Shubhali Parihar-Paradeshi got 473rd rank in UPSC 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.