मृत्युच्या दाढेतून परतल्यानंतर ध्येयच बदलले;किराणा दुकानदाराच्या मुलाचे जिद्दीवर UPSC त यश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 06:14 PM2022-05-30T18:14:34+5:302022-05-30T18:15:54+5:30
UPSC Result: घरच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत खेड्यातल्या किराणा दुकानदाराच्या मुलाचे दुसऱ्याच प्रयत्नात यशाला गवसणी
लातूर : घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असतानाही त्यावर मात करीत उदगीर तालुक्यातील हंडरगुळी या खेडेगावातील किराणा दुकानदाराचा मुलगा रामेश्वर सब्बनवाड याने यूपीएससी परीक्षेत २०२ वी रँक मिळवित यश मिळविले आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्याच प्रयत्नात त्याने यशाची पताका लावली असून, गावातील पहिला यूपीएससी उत्तीर्ण होण्याचा मानही मिळविला आहे.
रामेश्वर सुधाकर सब्बनवाड हा उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथील आहे. कुटुंबात आई-वडील आणि एक भाऊ आहे. कुटुंबास एकरभरही शेती नाही. त्यामुळे उदरनिर्वाह हा छोट्याशा किराणा दुकानावर आहे. रामेश्वरचे प्राथमिक शिक्षण गावातील रामराव पाटील प्राथमिक विद्यामंदिरात झाले. त्यानंतर ५ वी ते १० वीपर्यंतचे शिक्षणलातूरच्या जवाहर नवोदय विद्यालयात पूर्ण झाले. १२ वी पुणे येथील भारतीय जैन संघटनेच्या महाविद्यालयात झाली.
त्याच्या आईचे शिक्षण दहावीपर्यंत झाले असतानाही मुलगा शिकून डॉक्टर व्हावा अथवा कलेक्टर व्हावा, अशी इच्छा होती. परंतु, घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने त्याने नाइलाजास्तव पुण्यातील शासकीय महाविद्यालयात सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने ८ महिने खासगी कंपनीत नोकरी केली. तद्नंतर १६ महिने मुलांची शिकवणी घेतली.
दरम्यान, आईची दुसरी इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने २०१९ पासून यूपीएससीची तयारी करण्यास सुरुवात केली. २०२० मधील पहिल्या प्रयत्नात तो मुलाखतीपर्यंत पोहोचला. परंतु, अवघे सहा गुण कमी पडल्याने यश मिळाले नाही. त्यामुळे त्याने पुन्हा प्रयत्न सुरू केला. दुसऱ्या प्रयत्नात त्याने हे यश संपादन केले आहे.
ग्रामीण भागाच्या उन्नतीसाठी प्रयत्न...
रामेेश्वर सब्बनवाड म्हणाला, २०१८ मध्ये मी खूप आजारी पडलो होतो. त्यामुळे मला आयसीयूमध्ये दाखल करावे लागले होते. तेव्हा ग्रामीण भागातील परिस्थिती, आरोग्य सेवा अगदी जवळून पाहिली. आपण शिक्षण घेऊन मोठे झालो तरी आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो. त्यामुळे ग्रामीण भागाचा आणि खेड्यातील तरुणांची प्रगती साधावी म्हणून यूपीएससीच्या तयारीस लागलो. जिद्दीने अभ्यास केल्याने हे यश मिळाले आहे.