सडलेले अन्न, भाजीपाल्यापासून खत निर्मितीसाठी काळी सैनिकी माशीचा वापर!

By हरी मोकाशे | Published: December 13, 2023 07:48 PM2023-12-13T19:48:57+5:302023-12-13T19:49:12+5:30

लातुरातील कृषी महाविद्यालयात तीन महिन्यांपासून प्रयोग

Using black soldier fly to make compost from rotting food, vegetables! | सडलेले अन्न, भाजीपाल्यापासून खत निर्मितीसाठी काळी सैनिकी माशीचा वापर!

सडलेले अन्न, भाजीपाल्यापासून खत निर्मितीसाठी काळी सैनिकी माशीचा वापर!

लातूर : सडलेला भाजीपाला, घर- हॉटेलमधील शिल्लक अन् टाकाऊ अन्नाची समस्या दिवसेंदिवस जटील होत आहे. त्याची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावण्याबरोबरच त्यापासून दर्जेदार खत निर्मितीचा प्रयोग तीन महिन्यांपासून लातूरच्या कृषी महाविद्यालयात करण्यात येत आहे. त्यासाठी काळी सैनिकी माशीचा वापर करण्यात येत आहे. हा प्रयोग जिल्ह्यासाठी पथदर्शी ठरणारा आहे.

परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गतच्या लातुरातील कृषी महाविद्यालयातील किटकशास्त्र विभागातील पदव्युत्तर विद्यार्थी विविध खाद्यांचा काळी सैनिकी माशीच्या जीवनक्रमावरील परिणाम यावर संशोधन करीत आहेत. काळी सैनिकी माशीच्या वापरासंदर्भात विभागप्रमुख डॉ. विजय भामरे म्हणाले, स्वयंपाकगृहातील हिरवा, ओला कचरा, बाजारपेठेत सडलेली फळे, भाजीपाला तसेच घर, हॉटेल, रेस्टॉरंटमधील शिल्लक राहिलेल्या अन्नाचे व्यवस्थापन करण्याचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे. या जैविक कचऱ्यामुळे उग्र वास येतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते. या जैविक कचऱ्याच्या विघटनासाठी शाश्वत उपाय म्हणून काळी सैनिकी माशीचा उपयोग करण्यासंदर्भात संशोधन करण्यात येत आहे. या किटकाची अळी केवळ ४० दिवसांत जैविक कचऱ्याचे विघटन करते. त्यातून दर्जेदार खत निर्मिती होते. विशेष म्हणजे, गांडूळ खताला हा पर्याय आहे. त्यामुळे ओल्या कचऱ्याची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

संशोधन केंद्राची सहआयुक्तांकडून पाहणी...
या संशोधन प्रकल्पास जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका प्रशासनाचे सहआयुक्त रामदास कोकरे यांनी भेट देऊन माहिती घेतली. यावेळी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे, विभागप्रमुख डॉ. विजय भामरे, डॉ. व्यंकट जगताप, डॉ. दयानंद मारेे, डॉ. ज्ञानेश्वर सुरडकर आदी उपस्थित होते. या प्रकल्पावर कृष्णा मोरे, कृष्णा देशमुख हे संशोधन करीत आहेत.

हॉटेलमधील शिळ्या अन्नाचे लवकर विघटन...
कृषी महाविद्यालयातील किटकशास्त्र विभागातील पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांनी सडलेली फळे- भाजीपाला, गोठ्यातील शेण, पोल्ट्रीमधील टाऊन ओला कचरा आणि हॉटेलमधील शिळ्या अन्नावर काळी सैनिकी माशी सोडली. तेव्हा सर्वाधिक लवकर विघटन हॉटेलमधील टाकाऊ अन्नावर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या माशीमुळे ओल्या कचऱ्याची समस्या संपुष्टात येण्यास मदत होणार आहे.

ओल्या कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी मदत...
प्रत्येक घर, कॉलनी, हॉटेल परिसर आणि सार्वजनिक ठिकाणी ओल्या कचऱ्याचा प्रश्न निर्माण होत आहे. या भागात काळी सैनिकी माशांचे प्रमाण वाढविल्यास कचऱ्याची समस्या सुटण्याबरोबरच चांगले खत निर्मिती होईल. शिवाय, या माशींच्या अळ्यांचा वापर पोल्ट्री, वराह पालन, मत्स पालनासाठी खाद्यासाठी होऊ शकतो.
- डॉ. विजय भामरे, किटकशास्त्र विभागप्रमुख.

 

Web Title: Using black soldier fly to make compost from rotting food, vegetables!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.