वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे लवकरच भरणार - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
By हरी मोकाशे | Published: September 17, 2023 04:07 PM2023-09-17T16:07:21+5:302023-09-17T16:14:20+5:30
वर्ग चारच्या पदांबाबतही आपण सकारात्मक असून त्याचा निर्णय लवकरच घेणार असल्याचे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी सांगितले.
लातूर : येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त जागाबाबतची सद्यस्थिती जाणून घेतली असून येत्या १५ दिवसांत वर्ग तीनच्या रिक्त जागा भरल्या जातील. तज्ज्ञ प्राध्यापकांच्या भरतीसाठी राज्यस्तरावर समिती नेमली आहे. त्यांचा अहवाल येताच संचमान्य प्राध्यापकांची नेमणूक केली जाईल. तसेच वर्ग चारच्या पदांबाबतही आपण सकारात्मक असून त्याचा निर्णय लवकरच घेणार असल्याचे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी सांगितले.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कामकाजाचा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अधिष्ठाता डॉ. समीर जोशी, प्रा.डॉ. शैलेंद्र चौहाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख, कार्यकारी अभियंता डी. बी. नीळकंठ आदी उपस्थित होते.
यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, काही वैद्यकीय महाविद्यालयांच्या इमारती जुन्या झाल्या असल्याने येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेतून औषध उपचाराची सुविधा आता ५ लाखांवर नेण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेतील खासगी रुग्णालयातही रुग्णांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत.
शासकीय रुग्णालयात येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपुलकीने वागण्याच्या सूचनाही केल्या. सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरु करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, मंत्री मुश्रीफ यांनी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रास भेट दिली. तिथे बौद्धिक दिव्यांग मुलांना टीएलएम कीटचे वितरण करण्यात आले. यावेळी वैजनाथ व्हनाळे, सुरज बाजूळगे, पारस कोचेटा, व्यंकट लामजने, योगेश बुरांडे उपस्थित होते.