मुख्याध्यापक,केंद्रप्रमुखांची रिक्त पदे पदोन्नतीने भरावीत; प्राथमिक शिक्षक समितीचे धरणे
By संदीप शिंदे | Published: August 8, 2022 04:36 PM2022-08-08T16:36:17+5:302022-08-08T16:37:54+5:30
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून, प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही त्यावर कार्यवाही करण्यात आलेली नाही.
लातूर : जिल्ह्यातील शाळांमध्ये मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, प्राथमिक पदवीधर यांची रिक्त पदे पदोन्नतीने भरावीत, पदोन्नती दिल्यानंतर एक वेतनवाढ द्यावी यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने सोमवारी दुपारी ३ वाजेपासून जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून, प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही त्यावर कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे चटोपाध्याय व निवडश्रेणीचे आदेश काढावेत, शिक्षकांच्या मुळ सेवापुस्तिकेची पडताळणी तालुकानिहाय कॅम्प लावून करावी, गोपनीय अहवालाची प्रत शिक्षकांना देण्यात यावी, २०२१-२२ च्या सर्व शाळांना ४ टक्के सादील व शाळा अनुदान वितरीत करावे, शालेय पोषण आहाराचे मार्च ते जुलै २०२२ मधील इंधन, भाजीपाला, मतदनीसांचे मानधन देण्यात यावे, २०१५ पासून पोषण आहाराचा अहवाल सादर करण्याचा निर्णय रद्द करावा, १०० टक्के विद्यार्थ्यांना गणवेश वितरीत करावे यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलनात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे शिवाजीराव साखरे, माधवराव फावडे, कुलदीप पाटील, किशनराव बिरादार, संजय सुर्यवंशी, विकास पुरी, रंजना चव्हाण, अरुण सोळूंके, बालाजी येळीकर, रणजीत चौधरी, नजीर मुजावर, चंद्रकांत भोजने आदींसह शिक्षकांचा सहभाग होता.
सेवेत कायम केल्याचे आदेश काढावेत...
जिल्हा परिषदेतील पात्र शिक्षकांना सेवेत कायम केल्याचे आदेश काढावेत, एकाच तारखेस सेवेतरुजु झालेले सहशिक्षक व प्राथमिक पदवीधर यांच्या वेतनात शिक्षकाच्या वेतनापेक्षा तफावत असून, ती दुर करावी, एससी, एसटी, ओबीसी, मागासवर्गीय कर्मचारी व अधिकाऱ्यांचा अनुषेश भरुन काढावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.