सुटी संपली, उद्यापासून शाळांची घंटा वाजणार; १९ हजार विद्यार्थांचा पहिल्याच दिवशी होणार प्रवेश!
By संदीप शिंदे | Published: June 14, 2023 02:46 PM2023-06-14T14:46:54+5:302023-06-14T14:49:56+5:30
शाळांतील वर्गामध्ये पुन्हा बच्चेकंपनीचा किलबिलाट ऐकावयास मिळणार
लातूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून पहिलीसाठी पात्र असणाऱ्या १९ हजार ३९ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. गुरुवारपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार असून, पहिल्याच दिवशी या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात येणार आहेत. तसेच पुष्पगुच्छ, गणवेश आणि पुस्तके देऊन त्यांचे शाळांमध्ये स्वागत करण्यात येणार आहे.
उन्हाळी सुटी संपली असून, गुरुवारपासून शाळांची घंटा वाजणार आहे. शाळांतील वर्गामध्ये पुन्हा बच्चेकंपनीचा किलबिलाट ऐकावयास मिळणार असून, उन्हाळी सुट्टीत शिक्षण विभागाकडून पहिल्या वर्गात प्रवेशासाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील १९ हजार ३९ विद्यार्थी असून, यामध्ये ९७५३ मुले तर ९२८६ मुलींचा समावेश आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी नवगत विद्यार्थ्यांची गावात बैलगाडीद्वारे मिरवणूक काढण्यात येणार असून, पुष्पगुच्छ, पुस्तके, गणवेश देऊन स्वागत करण्यात येणार आहे. शिक्षण विभागकडूनही शाळांना याबाबत सूचना करण्यात आल्या असून, शाळांनीही प्रवेशोत्सवाची तयारी पूर्ण केली आहे.
तालुकानिहाय असे आहेत विद्यार्थी...
प्रवेशपात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये लातूर तालुक्यातील ३६५५, रेणापूर ११२०, औसा ३६५५, निलंगा २६९९, शिरूर अनंतपाळ ७६४, देवणी १०६३, उदगीर १७६२, जळकोट ८१३, अहमदपूर १७९७ तर चाकूर तालुक्यातील १७११ अशा एकूण १९ हजार ३९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे करणार स्वागत...
गुरुवारपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरूवात होणार असल्याने पहिलीच्या वर्गात प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, शालेय गणवेश, पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात येणार आहे. गावस्तरावर फुगे, फुलांनी सजविलेल्या बैलगाडी, ट्रॅक्टरद्वारे प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची मिरवणूकही काढण्यात येणार आहे. तसेच पालक, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक यांचाही यामध्ये सहभाग राहणार असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले.