लातूर शहरातील ५० हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:19 AM2021-04-24T04:19:04+5:302021-04-24T04:19:04+5:30
गतवर्षीपासून कोरोना हा एकच विषय समोर आहे. शासन, प्रशासन व सामान्य जनताही याच एका विषयात गुंतलेली आहे. मध्यंतरी काही ...
गतवर्षीपासून कोरोना हा एकच विषय समोर आहे. शासन, प्रशासन व सामान्य जनताही याच एका विषयात गुंतलेली आहे. मध्यंतरी काही काळ कमी झाल्यानंतर आता पुन्हा एकदा कोरोनाने सर्वोच्च पातळी गाठल्याचे जाणवत आहे. पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बाधित रुग्णांवर उपचारासाठी महानगरपालिका वर्षभरापासून युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. आरोग्य विभागासह पालिकेचे सर्वच विभाग कार्यरत आहेत. संशयित कोरोना रुग्णांच्या तपासण्या, विलगीकरण, कोविड सेंटरची उभारणी यासह प्रत्येक बाबीसाठी पालिकेचे लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत असल्याचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगितले.
जानेवारी महिन्यात लसीकरण सुरू झाल्यानंतर मनपाने त्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारली आहे. पालिकेच्या रुग्णालयांसह शहरातील खाजगी रुग्णालयांशी संपर्क साधत तेथेही पालिकेच्या वतीने मोफत लसीकरण केले जात आहे. शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मनपा रुग्णालय, पटेल चौक, लोकनेते विलासराव देशमुख मार्ग येथील औषधी भवन तसेच पूर्व भागातील नागरिकांसाठी राजीवनगर नागरी आरोग्य केंद्रात लसीकरणाची सुविधा आहे. या सर्व केंद्रांवर मोफत लसीकरणाची सुविधा आहे.
याशिवाय शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये सशुल्क लसीकरण सुरू आहे. महापौर व आयुक्तांच्या विनंतीवरून आयएमएने ९ खाजगी रुग्णालयांत पालिकेच्या वतीने मोफत लसीकरण करण्यास मान्यता दिली आहे. यापैकी शिवपुजे हॉस्पिटल व ममता हॉस्पिटलमध्ये लसीकरणास प्रारंभही झाला आहे. इतर रुग्णालयांत लवकरच ही सुविधा मिळणार आहे.