नियोजनअभावी लसीकरण दोन तास लांबले; माता, बालकांची गैरसोय

By संदीप शिंदे | Published: August 2, 2023 05:21 PM2023-08-02T17:21:18+5:302023-08-02T17:21:42+5:30

निलंगा उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार

Vaccination delayed by two hours due to lack of planning; Inconvenience of mother, child | नियोजनअभावी लसीकरण दोन तास लांबले; माता, बालकांची गैरसोय

नियोजनअभावी लसीकरण दोन तास लांबले; माता, बालकांची गैरसोय

googlenewsNext

निलंगा : येथील उपजिल्हा रुग्णालयात लहान बालकांचे विविध प्रकारचे लसीकरण करण्यात येते. त्यामुळे सकाळपासून लसीकरण कक्षासमोर रांगा असतात. मात्र, बुधवारी सकाळी ११:३० वाजेपर्यंत कक्ष कुलूपबंद होता. त्यामुळे माता, बालकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. अनेकांनी तर उशिरा होत असल्याने लसीकरण न करताच घरचा रस्ता धरला.

निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालय नावालाच असून येथे रुग्णांना अनेक गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. दर बुधवारी व शनिवारी उपजिल्हा रुग्णालयामध्ये एन फेकलायटस, कावीळ अ, कावीळ ब, व्हिटॅमिन ए, धनुर्वात, बीसीजी, पोलिओ अशा अनेक प्रकारचे लसीकरण नवजात बालकापासून ते पाच वर्षांच्या बालकांपर्यंत दिले जाते. बुधवारी सकाळी नऊ ते ९:३० वाजेपासूनच पालकांनी लसीकरणासाठी रांगा लावल्या होत्या. मात्र, ११:३० वाजेपर्यंत या विभागाला कुलूप होते. सुमारे दीड ते दोन तास प्रतीक्षा करूनही कोणीच इकडे फिरकत नसल्याने पालकांनी संताप व्यक्त केला. वैद्यकीय अधिकारी दिनकर पाटील यांच्याकडे तक्रार करताच त्यांनी तत्काळ उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल होत कर्मचाऱ्यांना सूचना देऊन लसीकरणाला सुरुवात केली. मात्र, यादरम्यान वाट पाहून अनेक पालक आपल्या बालकांना लसीकरण न करताच परत घेऊन गेले. उपजिल्हा रुग्णालय येथे सर्व सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, मनुष्यबळ व जबाबदार अधिकाऱ्यांची कमतरता असल्यामुळे येथील रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची रुग्णांची ओरड आहे.

दक्षता घेण्याच्या कर्मचाऱ्यांना सूचना
वैद्यकीय अधिकारी डॉ.दिनकर पाटील म्हणाले, निलंगा तहसील कार्यालय येथे महसूल विभाग कर्मचाऱ्यांचा आरोग्य शिबिराचा कार्यक्रम होता. त्यामुळे कर्मचारी या शिबिरास गेले होते. परिणामी, लसीकरणासाठी आलेल्या बालक, पालकांची गैरसोय झाली. यापुढे असे प्रकार होणार नाही. याची दक्षता घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

 

Web Title: Vaccination delayed by two hours due to lack of planning; Inconvenience of mother, child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.