पुरवठा ठप्प झाल्याने लसीकरणाला खीळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:19 AM2021-04-25T04:19:26+5:302021-04-25T04:19:26+5:30
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला. सुरुवातीच्या काळामध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षांपुढील सहव्याधी नागरिकांना ...
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला. सुरुवातीच्या काळामध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षांपुढील सहव्याधी नागरिकांना लस देण्यात येत होती. आता सर्वच ४५ वर्षांच्या पुढील नागरिकांना लस देण्यात येत आहे. ४५ वर्षांपुढील नागरिक जिल्ह्यात लस घेण्यास पात्र आहेत. त्यानुसार, आतापर्यंत १ लाख ९५ हजार व्यक्तींनी लस घेतली आहे. पहिला आणि दुसरा डोस मिळून २ लाख १९ हजार ५५८ डोस दिले गेले आहेत. परंतु, गेल्या तीन-चार दिवसांपासून लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे १७१ पैकी ३८ केंद्रे सुरू होती. उर्वरित सर्व केंद्रे लस नसल्यामुळे बंद आहेत. आरोग्य प्रशासनाने शासनाकडे ४ लाख ९५ हजार डोसची मागणी केली आहे. परंतु, अद्याप शासनाकडून पुरवठा झालेला नाही. त्यामुळे काही केंद्रे बंद ठेवावी लागली आहेत. जिल्हास्तरावरचा स्टॉक संपला असून केंद्र स्तरावरचाही साठा संपला आहे. त्यामुळे उद्या सर्वच केंद्रांवरील लसीकरण बंद राहण्याची शक्यता आहे.
लसींचा विश्वास वाढला...
बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामध्ये लस घेतलेल्यांमध्ये लागण कमी आहे. शिवाय, त्यांच्यात लक्षणेही कमी आहेत. मृत्यू तर अजिबात नाही. त्यामुळे लसींची विश्वासार्हता वाढली असल्याने नागरिक लस द्या म्हणून मागणी करीत आहे. परंतु, गेल्या तीन-चार दिवसांपासून पुरवठा कमी झाला आहे. जवळपास पुरवठाच नाही, त्यामुळे आरोग्य प्रशासन हतबल झाले आहे.