लसीच्या तुटवड्याने लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढला; ६ वरून आता २४ गावांत लागण

By हणमंत गायकवाड | Published: September 15, 2022 05:31 PM2022-09-15T17:31:31+5:302022-09-15T17:32:05+5:30

लातूर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १७६ जनावरे बाधित आढळली आहेत 

Vaccine shortages led to outbreaks of lumpy disease; From 6 now infected in 24 villages | लसीच्या तुटवड्याने लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढला; ६ वरून आता २४ गावांत लागण

लसीच्या तुटवड्याने लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढला; ६ वरून आता २४ गावांत लागण

Next

लातूर : लम्पी स्कीन डिसीजचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढत असून, सुरुवातीला ८७ जनावरे बाधित होती. आता १७६ जनावरांना या आजाराची लागण झाली आहे. शिवाय, लसींचाही तुटवडा जाणवत असून, १ लाख १६ हजार डोसेस जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून उपलब्ध केले जात आहेत. यातील ८० हजार डोसेस उद्यापर्यंत मिळण्याची शक्यता आहे. 

लम्पी स्कीन डिसीजचा प्रादुर्भाव गाय आणि बैल वर्गामध्ये वाढत आहे. म्हैस वर्गात त्या तुलनेत या आजाराचा प्रादुर्भाव नाही. त्यामुळे २ लाख ५५ हजार गाय व बैल वर्गातील पशुधनाला लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पशुसंवर्धन विभाग पशुधनाला लस देण्यासाठी मेहनत घेत आहे. ज्या गावात पशुधनाला लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झाला आहे, त्या गावात पाच कि.मी. अंतरापर्यंतच्या पशुधनाला लस दिली जात आहे. आतापर्यंत २३ हजार ३०० पशुधनाला लस देण्यात आली आहे. फिल्डवर ३७ हजार पशुधनाला लस देण्याची मोहीम पशुधन विभागाचे कर्मचारी राबवीत आहेत. 

गाय, बैल वर्गातील २ लाख ५५ हजार संख्या 
जिल्ह्यात गाय व बैल वर्गातील पशुधनाची संख्या २ लाख ५५ हजार आहे. ज्या गावामध्ये या आजाराचे पशुधन आढळले आहे, त्या गावाच्या पाच कि.मी. अंतरातील गाय व बैल वर्गातील पशुधनाला लस दिली जाणार आहे. १ लाख १६ हजार मात्रा उपलब्ध झाली असून, त्यातील ८० हजार डोसेस उद्यापर्यंत मिळणार आहेत. 

म्हैस वर्गाला लस नाही 
म्हैस वर्गातील पशुधनाची संख्याही २ लाख ५५ हजार असून, या वर्गामध्ये लम्पी स्कीन डिसीजचा प्रादुर्भाव नाही. त्यामुळे म्हैस वर्गाला लस दिली जाणार नसल्याचे पशुधन विभागाच्या वतीने सांगण्यात आले. 

या गावांत प्रादुर्भाव
लातूर तालुक्यातील गुंफावाडी, चिंचोली बल्लाळनाथ, मुरुड आदी गावांमध्ये लम्पी स्कीन डिसीजचे पशुधन आढळले आहेत. तसेच चिंचोली, हासोरी, कासार बालकुंदा, टाकळगाव, औसा, हाळी हंडरगुळी, उदगीर, निलंगा, सरवडी, कवठा आदी गावांमध्ये लम्पी स्कीन डिसीजचे पशुधन आढळले आहेत.

Web Title: Vaccine shortages led to outbreaks of lumpy disease; From 6 now infected in 24 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.