वलांडीचे विश्रामगृह मद्यपींसाठी बनले आश्रयस्थान, झाडे- झुडुपे वाढली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:24 AM2021-09-05T04:24:08+5:302021-09-05T04:24:08+5:30
वलांडी : लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी देवणी तालुक्यातील वलांडी येथे जवळपास ३० वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या शासकीय विश्रामगृहाची दुरवस्था झाली आहे. ...
वलांडी : लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी देवणी तालुक्यातील वलांडी येथे जवळपास ३० वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या शासकीय विश्रामगृहाची दुरवस्था झाली आहे. विश्रामगृह परिसरात झाडे- झुडुपे वाढली असून, विघ्नसंतोषींनी टेबल- खुर्चींची मोडतोड केली आहे. विशेष म्हणजे, हे गृह मद्यपींसाठी आश्रयस्थान बनले आहे. संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
देवणी तालुक्याच्या निर्मितीअगोदर उदगीर तालुका होता. त्या कालावधीत उदगीर- निलंगा राज्यमार्गावरील वलांडी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व सुविधांनीयुक्त शासकीय विश्रामगृह उभारण्यात आले. तत्कालिन आमदार धर्माजी सोनकवडे यांच्या प्रयत्नातून १९९० च्या दरम्यान ही वास्तू उभारण्यात आली. या इमारतीसाठी भूसंपादन करण्यात येऊन बांधकाम करण्यात आले. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च झाला. या शासकीय विश्रामगृहामुळे या भागात आलेले लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांची सोय होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे थोडासा वेळ थांबण्यासाठी अथवा मुक्कामाची सोय झाली.
वलांडीच्या शासकीय विश्रामगृहात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध असल्याने सुरुवातीच्या काळात या इमारतीचा वापर होत होता. त्यानंतर मात्र इमारतीकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले. दरम्यान, या इमारतीच्या देखभालीसाठी नियुक्त करण्यात आलेले कर्मचारीही सेवानिवृत्त झाले. त्यामुळे इमारतीची दुरवस्था होण्यास सुरुवात झाली. सध्या या इमारतीच्या परिसरात झाडे- झुडुपे वाढली आहेत. त्यामुळे जनावरांचा वावर होत आहे. परिसरातील काही नागरिक इमारतीच्या परिसरात शौचास जात आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे.
विशेष म्हणजे, काही मद्यपी या विश्रामगृहाचा आधार घेत आहेत. त्यामुळे विश्रामगृहाबरोबरच परिसरात बाटल्यांचा खच पडल्याचे पहावयास मिळत आहे. याशिवाय, काही विघ्नसंतोषींनी इमारतीतील दारे, खिडक्या, टेबल, खुर्चींची मोडतोड केली आहे. इमारतीच्या दरवाज्यास कुलूप नसल्याने कोणीही कधीही ये-जा करीत असते. त्यामुळे इमारतीचा विविध कारणांसाठीही उपयोग होत असल्याचे पहावयास मिळत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन डागडुजी करून देखभालीसाठी कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.
बाटल्यांचा पडला खच...
विश्रामगृहाच्या इमारतीस कुलूप नसल्याने दारे सतत उघडी आहेत. त्यामुळे कोणीही कधीही ये- जा करीत असते. देखभालीसाठी कर्मचारी नसल्याने इमारतीच्या स्वच्छतागृहात बाटल्यांचा खच पडला आहे. तसेच फर्निचर अस्ताव्यस्त पडल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस दुरवस्था वाढत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
कर्मचारी नियुक्तीची मागणी...
वलांडीतील शासकीय विश्रामगृहास कर्मचारी नसल्याने देखभाल होत नाही. त्यामुळे ते सध्या बंद आहे. यासंदर्भात वरिष्ठांकडे माहिती देण्यात येऊन कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे, असे देवणीचे प्रभारी उपविभागीय अभियंता पुजारी यांनी सांगितले.