Valentine Day : महेबूब चाचांच्या घरी चालतो प्राण्यांतील प्रेमाचा बारमाही उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 06:04 PM2019-02-13T18:04:54+5:302019-02-13T18:11:29+5:30
महेबूब चाचांच्या कुटुंबाचे हे प्रेम इतरांनही प्रेरणादायी ठरणारे आहे़
- आशपाक पठाण
लातूर : बेजुबान जानवरों से करो दोस्ती और प्यार, जुबान वालों की तरह ये मतलबी नही होते याऱ हीच प्रेमाची प्रेरणा लातूरच्या महेहूबचाचांच्या कुटंबाने घेतली असून जखमी, आजारी, बेवारस मुक्या जिवांचा त्यांना असा लळा लागला आहे की, ते प्राण्यांवर मुलांप्रमाणे प्रेम करीत आहेत़ ३० ते ३५ वर्षांपूर्वी प्राण्यांशी जुळलेले प्रेमाचे संबंध आजही कायम आहेत़ विशेष म्हणजे, वडील मुलांसाठी घर बांधतात, मालमत्ता खरेदी करतात़ मात्र, चांचांनी प्राण्यावरील प्रेमाखातर या गोष्टीला बगल देत घरातच फळझाडे लावून पूशंच्या चारा, पाणी आणि राहण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे़ पन्नाशी ओलांडलेल्या महेबूब चाचांच्या प्राण्यावरील प्रेमाचा लळा इतरांना प्रेरणादायी ठरला आहे़
मुक्या प्राण्यांच्या वेदनांची जाणीव माणसाला सहसा होत नाही़ त्यामुळे अनेकदा किरकोळ आजारांमुळे त्यांचा जीव जातो़ शाळेत जाताना एका कुत्र्याच्या पायाला मार लागल्याचे दिसले़ तो व्हिव्हळत होता़ त्याला घेऊन घरी गेल्यावर आई-वडिल रागावले़ पण चाचांनी त्या कुत्र्याला सोडले नाही़ कुटुंबाचा विरोध असतानाही आठ दिवस घरात उपचार करून त्याला घरातच ठेवले़ वयाच्या १६ व्या वर्षात महेबूबचाचांचे हे पहिले प्रेम जुळले़ अनेकांनी त्यांची टिंगल टवाळी केली पण त्यांनी याकडे कधीच लक्ष दिले नाही़ या प्रेमाचा लळा लागल्याने शिक्षणात मन रमेना झाले़ कधी कोणी माहिती दिली की, लागलीच त्या पशूंना घरी आणून उपचार करण्याची सवयच त्यांना जडली़ स्वत: टेम्पो चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते़ मात्र, घरात आणून ठेवलेल्या पशू-पक्षांना आपल्या घासातील घास भरविला़
लातूरसारख्या शहरात लोक वाहनांना पार्किंगसाठी जागा सोडण्यास धजावत नाहीत़ इथे तर चाचांनी स्वत:च्या राहत्या घरात स्वतंत्रपणे ८०० स्क्वेअर फुट जागा रिकामी सोडून फळझाडांची लागवड केली़ या झाडांवर दिवसभर पक्षांचा चिवचिवाट सुरू असतो़ शिवाय, चार खोल्यांत अनेक ठिकाणी त्यांनी पशू पक्षांची घरटीही बांधली़ ही घरटी कधीच रिकामी नसतात़ माणसं माणसाजवळ येत नाहीत इथे मात्र, महेबूब चाचांच्या घरात जागोजागी विविध प्रकारचे पक्षी एकत्र नांदताना दिसतात़ चाचांचे संपूर्ण कुटुुंबच पक्षांच्या प्रेमात अडकले आहे़ त्यामुळे मुलांवर कमी पण पक्षांवर अधिकचे लक्ष ठेवून असतात़ घराला कधी कुलूप नाही, नातेवाईकांच्या समारंभात कधीच संपूर्ण कुटुंब जात नाही़ घरातील प्रत्येकाच्या अंगा, खांद्यावर कबुतर, चिमण्या, खारूताई, ससा, मांजर, कुत्रे हे प्राणी खेळत असतात़ त्यांच्या घरात चिमण्यांचा चिवचिवाट आणि पक्षांचा किलबिलाट बारा महिने ऐकावयास मिळतो़
यांच्याशी जुळले प्रेमाचे नाते
माणूस हा माणसाशी प्रेम करतो़ मैत्री करतो़ मात्र, मुक्या पशूपक्षांसोबची मैत्री सहसा दुर्मिळ असते़ आजच्या धावपळीच्या जीवनात पशूपक्षांचा सांभाळ करायला वेळही नाही़ मुलांना पक्षी दाखवायचे असतील तर कुठल्या तरी संग्रहालयाचा मार्ग शोधावा लागतो़ त्यांच्यासाठी घरटी उभारणे, चारा पाण्याची सोय करणे, बेवारस आढणाऱ्या प्राण्यांची मदत करणे ही बाब तर खूप लांबच राहीली़ मात्र, लातूरचे महेबूब चाचा रस्त्याने गाढव, गाय असो की, कुत्री, मांजरं त्यांना आडलेली दिसली लगेच मदतीसाठी धावपळ करतात़ आजवर त्यांनी हरीण, मोर, ससा, चित्तर, काळा सराटी, पांढरा मानेचा ककरोचा, शिकरा, साळुंक्या, तांबट, खारूताई, पानबदक, पानकोंबडी, पानकावळा, सुतार, चिमण्या, कावळे, घार, मुंगूस आदी हजारो पशूपक्षांचे प्राण वाचविले़ यात त्यांच्या पत्नीसह मुले, सुना, नातवंडे मदतीसाठी तत्पर असतात़
प्रेमाखातर कमाईचा वाटा चाऱ्यात
पशू-पक्षांसोबत जुळलेले प्रेमाचे नाते टिकवून ठेवण्यासाठी चाचांना आपल्या कमाईतील काही वाटा पशूधनाच्या चाऱ्यावर खर्च करावा लागतो़ घरात सदैव ज्वारी, गहू, तांदूळ, मका, शेंगदाणे, दाळवा आणि राळे असे एकुण दोन क्विंटल धान्य दरमहा खरेदी करावी लागतात़ शिवाय, ही प्रेमिका नाराज होऊ नये, यासाठी वेळोवेळी त्यांच्या पाठीवर मायेचा हात फिरविण्यासाठी संपूर्ण कुटुंब त्यांच्याच सेवेत असते़ त्यांच्या अशा या आगळ्या वेगळ्या प्रेमाला सलाम़ व्हॅलेंटाईन डे हा प्रेम करून साजरा करण्याची परंपरा आहे, महेबूब चाचांच्या कुटुंबाचे हे प्रेम इतरांनही प्रेरणादायी ठरणारे आहे़