३१ मे पर्यंत विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करा; अन्यथा शिक्षकांचे वेतन नाही होणार!
By संदीप शिंदे | Published: May 27, 2023 05:43 PM2023-05-27T17:43:58+5:302023-05-27T17:44:46+5:30
वारंवार मुदतवाढ देऊनही शाळांचा कानाडोळा
लातूर : शाळांतील बोगस पटसंख्येला आळा घालण्यासाठी व शासनाच्या विविध योजना प्रत्यक्ष विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आधार प्रमाणीकरण करण्यात येत आहे. वारंवार मुदतवाढ देऊनही जिल्ह्यात अजूनही ६३ हजार २६८ विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण रखडले आहे. यासाठी ३१ मे ची डेडलाईन देण्यात आली असून, या कालावधीत विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण न करणाऱ्या शाळांमधील शिक्षकांचे वेतन रोखण्यात येणार आहे.
शालेय विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी मागील वर्षीपासून शिक्षण विभागाच्या शाळांना सुचना आहेत. यासाठी वेळोवेळी प्रशिक्षणही देण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यात एकूण २ हजार ६९६ शाळांमध्ये ५ लाख १३ हजार ८१३ विद्यार्थी आहेत. आतापर्यंत यातील ४ लाख ५० हजार ५४५ विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. याची टक्केवारी ८७.६९ टक्के असून, अद्याप ६३ हजार २६८ विद्यार्थ्यांचे अर्थात १४.०४ टक्के आधार प्रमाणीकरण रखडले आहे. या विद्यार्थ्यांचे प्रमाणीकरण ३१ मे पर्यंत पुर्ण करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. दिलेल्या मुदतीत प्रमाणीकरण न केल्यास पुढील वेतन स्थगित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
आधार प्रमाणीकरणासाठी शिबिर...
वारंवार लेखी व तोंडी सुचना देऊनही अनुदानित व स्वंयअर्थसहायित शाळांच्या मुख्यध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या आधार प्रमाणीकरणाचे काम केलेले नाही. अशा सर्व मुख्याध्यापकांना २९ मे रोजी सकाळी १० वाजता बार्शी रोडवरील नेटीझन्स स्कूल येथे उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावेळी मुख्याध्यापक, लिपिकांना लॅपटॉप, आधार कार्ड व इतर आवश्यक त्या माहितीसह उपस्थित रहावे लागणार आहे. शिबिरात अडचणीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी नागेश मापारी यांनी सांगितले.
६३ हजार विद्यार्थ्यांचे प्रमाणीकरण रखडले...
अहमदपूर तालुक्यातील ५१३०, औसा ३८८६, चाकूर ३८०९, देवणी २०५९, जळकोट ३१५७, लातूर ८०९८, लातूर युआरसी १- ८०६५, लातूर युआरसी २-१२८९०, निलंगा ५८९७, रेणापूर २१३६, शिरुर अनंतपाळ ६५३ तर उदगीर तालुक्यातील ७ हजार ४८८ अशा एकूण ६३ हजार २६८ विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप रखडलेले आहे. शाळांना वेळोवेळी सुचना देऊनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे ३१ मे ची डेडलाईन जवळ आली असताना शिक्षण विभागाकडून शाळांना सक्तीच्या सुचना करण्यात आल्या आहेत.