Vedanta Foxconn Deal, NCP: राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे लातूरच्या औसामध्ये निषेध, निदर्शने
By हरी मोकाशे | Published: September 21, 2022 04:46 PM2022-09-21T16:46:03+5:302022-09-21T16:46:39+5:30
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याने संताप
औसा (जि. लातूर) : वेदांता, फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याचा निषेध राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने बुधवारी करून शिंदे- फडणवीस सरकारच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. अफसर शेख, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव सुलेमान शेख, मराठवाडा अध्यक्ष प्रशांत कदम, जिल्हाध्यक्ष मुस्तफा इनामदार, आशिष शेलार, गोविंद जाधव, अविनाश टिके, मेहराज शेख, कीर्ती कांबळे, वैशाली नारायणकर, आनंद बनसोडे आदींची उपस्थिती होती.
यावेळी सुनील गव्हाणे म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारने स्वार्थासाठी २ लाख कोटी गुंतवणुकीचा प्रकल्प गुजरातला भेट देऊन दोन लाख बेरोजगारांचा रोजगार हिरावून घेतला आहे. सामाजिक व राजकीयदृष्ट्या सजग होऊन या चुकीच्या निर्णयाचा विरोध केला पाहिजे. या प्रकल्पासाठी महाविकास आघाडी सरकारने यशस्वी पाठपुरावा केला होता; पण राज्यात नाट्यमयरीत्या स्थापन झालेल्या शिंदे- फडणवीस सरकारने मोदी- शहांना हा प्रकल्प गिफ्ट देऊन उपकाराची फेड केल्याचा आरोपही त्यांनी केला.
यावेळी डॉ. अफसर शेख म्हणाले की, सरकारी संस्थांचे होणारे खाजगीकरण, नोकर भरतीत सरकारची उदासीनता आणि महाराष्ट्राची केंद्र व राज्य सरकाडून होणारी औद्योगिक पिळवणूक सर्वांसाठीच चिंतेची बाब आहे. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या.