आरक्षणासाठी वीरशैव लिंगायत समाजाचा महामोर्चा; धर्मगुरूंसह राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा सहभाग
By आशपाक पठाण | Published: December 21, 2023 06:55 PM2023-12-21T18:55:34+5:302023-12-21T18:55:42+5:30
गंजगोलाई येथील महात्मा बसवेश्वर मंदिरात शैलेश पाटील चाकूरकर यांच्या हस्ते नारळ फोडून या महामोर्चाला सुरुवात झाली.
लातूर : वीरशैव लिंगायत समाजाचा लिंगायत, हिंदू लिंगायतच्या आरक्षणासाठी लिंगायत महासंघाच्या वतीने गुरुवारी महामोर्चा काढण्यात आला. या महामोर्चात लिंगायत महासंघाचे अनेक शिवाचार्य व राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते तसेच महिला मंडळांसह हजारो समाजबांधव सहभागी झाले होते. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
गंजगोलाई येथील महात्मा बसवेश्वर मंदिरात शैलेश पाटील चाकूरकर यांच्या हस्ते नारळ फोडून या महामोर्चाला सुरुवात झाली. हा महामोर्चा वीरशैव लिंगायत समाजाच्या विविध मागण्यांसाठी काढण्यात आला. त्यात लिंगायत, हिंदू लिंगायत या नावाला वाणी नावाला असलेले आरक्षण लागू होण्यासाठी शासनाने शुध्दिपत्रक काढावे तसेच मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वर स्मारकाचे काम त्वरित सुरू करावे. तसेच महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची रचना करून २ हजार कोटींचा निधी द्यावा. तसेच निलंगा तालुक्यातील देवीहल्लाळी या गावात महात्मा बसवेश्वरांचे भाच्चे चन्नबसवेश्वर यांचे वास्तव्य होते म्हणून या गावाला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा व लिंगायत समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा व तालुका पातळीवर वसतिगृह सुरू करावे आदी मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या.
शि. भ. प. शिवराज नावंदे गुरूजी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रा. सुदर्शनराव बिरादार यांच्या नेतृत्त्वाखाली जुने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी शैलेश पाटील चाकूरकर, शंभुलिंग शिवाचार्य महाराज उदगीर, काशीनाथ शिवाचार्य महाराज पाथरीकर, बालानंद महाराज चापोली या धर्मगुरूंसह गुरूनाथ मग्गे, अविनाश रेशमे, शिवाजी रेशमे, माजी सभापती लक्ष्मीकांत मंठाळे, लिंगायत महासंघाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील, कीर्तनकार मंडळी, राजशेखर लाळीकर, बालाजी पाटील - येरोळकर, कैलास जांबकर, संगमेश्वर बिरादार, सोमेश्वर स्वामी, राजाभाऊ वाघमारे, मन्मथ पाटील, रामलिंग बुलबुले, विश्वनाथप्पा मिटकरी, तानाजी पाटील - भडीकर, संजय लिंबाळे, ॲड. अजय वागळे, संयोजन समितीचे अध्यक्ष नागनाथप्पा भुरके, प्रा. वैजनाथ मलशेट्टे, प्रा. विठ्ठल आवाळे, बसवराज ब्याळे, भिमाशंकर शेळके, बलराज खंडोमलके, सुनील होनराव, विरेंद्र केवळराम, माजी नगरसेवक सुभाषप्पा सुलगुडले, सौ. छाया चिंदे, कल्पना बावगे, संगीता भुसनुरे, संगीता मलंग, वैशाली व्होनाळे, प्रीती सोनाळे, बालाजी पिंपळे, शिवराज शेटकार, प्रा. संगमेश्वर पानगावे, शरणप्पा अंबुलगे, सुभाष शंकरे, विश्वनाथ निगुडगे, शंकरराव पाटील - गुंजोटीकर यांच्यासह हजारो समाजबांधव मोर्चात सहभागी झाले होते.