पशुवैद्यकीय दवाखाने आता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:00 AM2021-01-08T05:00:19+5:302021-01-08T05:00:19+5:30
लातूर : बहुतांश पशुपालकांना आपल्या पशुधनावर उपचार करण्यासाठी उशिर होत असल्याने अनेकदा पशुवैद्यकीय दवाखाने बंद होत असत. त्यामुळे पशुपालकांना ...
लातूर : बहुतांश पशुपालकांना आपल्या पशुधनावर उपचार करण्यासाठी उशिर होत असल्याने अनेकदा पशुवैद्यकीय दवाखाने बंद होत असत. त्यामुळे पशुपालकांना ताटकळत अथवा हेलपाटे मारावे लागत होते. ही समस्या जाणून घेऊन राज्याच्या पशुसंवर्धन आयुक्तालयाने गुरुवारपासून सकाळी ९ ते दुपारी ४.३० वा. पर्यंत ही दवाखाने सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पशुपालकांची गैरसोय दूर होणार आहे.
जिल्ह्यात पशुवैद्यकीय दवाखाने १२२, तालुका लघु पशुसर्वचिकित्सालये ६, जिल्हा पशुसर्वचिकित्सालय- १, फिरता पशुवैद्यकीय दवाखाना- १ असे एकूण १३० पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. पूर्वी ही पशुवैद्यकीय दवाखाने सकाळी ९ ते दुपारी १२ वा. पर्यंत आणि सायंकाळी ४ ते ६ वा. पर्यंत सुरु राहत असत. दरम्यान, ग्रामीण भागातील पशुपालकांना सदरील वेळेत आपल्या पशुधनास उपचारासाठी अथवा लसीकरणासाठी आणणे शक्य होत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे सदरील दवाखान्यांच्या वेळेत बदल करावा, अशी मागणी होत होती.
दरम्यान, पशुसंवर्धन आयुक्तालयाने राज्यातील जिल्हा परिषदांकडून यासंदर्भात अभिप्राय मागविला होता. त्यानंतर सुधारित वेळेस मान्यता देण्यात आली आहे. सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी ९ ते दुपारी ४.३० वा. पर्यंत आणि शनिवारी सकाळी ८ ते दुपारी १ वा. पर्यंत सर्व पशुवैद्यकीय दवाखाने सुरु राहणार आहेत. नव्या वेळापत्रकाच्या अंमलबजावणीस गुरुवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. आकस्मिकप्रसंगी २४ तास सेवा उपलब्ध राहणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आर.डी. पडिले यांनी सांगितले.
जिल्ह्यात ५ लाख पशुधन...
जिल्ह्यातील जवळपास २ लाख पशुपालकांकडे ५ लाख १२ हजार पशुधन आहे. नव्या वेळापत्रकामुळे पशुपालकांची गैरसोय दूर होणार आहे. जिल्ह्यातील लंपीस्कीन डिसीजची साथ आटोक्यात आली असून ७० हजार पशुधनास लसीकरण करण्यात आले आहे. तसेच लाळ्या खुरकतची ३ लाख ९० हजार पशुधनावर लसीकरण करण्यात येऊन आधार नोंदणी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजकुमार पडिले यांनी सांगितले.