पशुवैद्यक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा
By संदीप शिंदे | Published: August 4, 2023 04:37 PM2023-08-04T16:37:45+5:302023-08-04T16:38:01+5:30
पशु वैद्यक व पशु विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी गेल्या आठ दिवसांपासून संपावर आहेत.
उदगीर : येथील पशुवैद्यक व पशु विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या आठ दिवसांपासून संपावर असून, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थ्यांनी शुक्रवारी मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना दिले.
पशु वैद्यक व पशु विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी गेल्या आठ दिवसांपासून संपावर आहेत. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारास टाळे ठोकले आहे. शुक्रवारी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या विद्यार्थ्यांनी शहरात मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे निवेदन महसूल अधिकाऱ्यांना दिले. नवीन प्रस्तावित डी.व्ही.एस्सी. अभ्यासक्रम रद्द करण्यात यावा, श्रेणी २ चे पशुवैद्यक दवाखाने श्रेणी १ मध्ये रूपांतर करून पशुवैद्यक पदवीधर नेमण्यात यावे, खाजगी पशुवैद्यक महाविद्यालये सुरू करू नये, या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला.
या मोर्चाचे नेतृत्व प्रणय माने, अजिंक्य लांडगे, गुरुनाथ बेरूले, विकास कराले, अक्षय चिलमे, वैभव गुब्रे,वैभव शिंदे, संदेश नेटके, श्याम स्वरादेकर, अनुज कोली, भीमांजली गायकवाड, संकेती बीजूरकर, चैताली भोसले, सुमित महाजन यांनी केले.