लम्पीचा प्रादुर्भाव... पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांची रविवारची सुट्टी बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 06:07 AM2022-09-19T06:07:49+5:302022-09-19T06:08:27+5:30
पूर्वी सकाळी ९ ते सायंकाळी ४.३० वा.पर्यंत पशुवैद्यकीय दवाखाने सुरू राहायचे.
हरी मोकाशे
लातूर : लम्पीचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या दररोजच्या वेळेत अडीच तासांची वाढ केली आहे. शिवाय, रविवारीही पशुवैद्यकीय सेवा देणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे अधिकारी ते कर्मचारी या सर्वांची साप्ताहिक सुट्टी बंद झाली आहे.
माशा, डास, गोचीड, चिलटांमुळे लम्पीचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पशुसंवर्धन आयुक्तालयाने हा रोग नियंत्रणात येईपर्यंत तात्पुरती व्यवस्था म्हणून राज्यातील जिल्हा पशुवैद्यकीय, तालुका, श्रेणी- १ व २, सर्व पशुवैद्यकीय दवाखाने आणि फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या दैनंदिन वेळेत अडीच तासांची वाढ केली आहे.
पूर्वी सकाळी ९ ते सायंकाळी ४.३० वा.पर्यंत पशुवैद्यकीय दवाखाने सुरू राहायचे. आता सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
आकस्मिकप्रसंगी २४ तास पशुवैद्यकीय सेवा सुरू राहणार आहे. कार्यालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सकाळी कामाच्या वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर आणि सायंकाळी अर्धा तास उशिरापर्यंत थांबावे लागणार आहे.