महामार्गावरील खेडेगावचे बसथांबे गेले खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:58 AM2020-12-04T04:58:15+5:302020-12-04T04:58:15+5:30
केळगाव : लातूर- जहिराबाद महामार्ग निलंगा तालुक्यातून असून रस्त्याचे काम करण्यात येत आहे. दरम्यान, हा रस्ता जमीन सपाटीपासून ७ ...
केळगाव : लातूर- जहिराबाद महामार्ग निलंगा तालुक्यातून असून रस्त्याचे काम करण्यात येत आहे. दरम्यान, हा रस्ता जमीन सपाटीपासून ७ ते ८ फूट उंच बनविण्यात येत असल्याने महामार्गावरील खेडेगावचे बसथांबे हे खड्ड्यात गेल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येथील प्रवाशांना रस्त्यावर थांबावे लागत आहे.
निलंगा तालुक्यातून जाणाऱ्या लातूर- जहिराबाद महामार्गाचे काम सुरू आहे. या भागातील बहुतांश ठिकाणचा रस्ताही तयार करण्यात आला आहे; परंतु हा रस्ता जमीन सपाटीपासून ७ ते ८ फूट उंच बनविण्यात येत आहे.
ग्रामीण भागातील प्रवाशांच्या सोयीसाठी ५ ते ६ वर्षांपूर्वी विविध निधीतून बसथांबे तयार करण्यात आले होते. त्यामुळे पावसाळ्यात अथवा उन्हाळ्यात प्रवाशांना तिथे बसता येत होते; परंतु महामार्गाच्या रस्त्यामुळे हे थांबे खाली झाले आहेत. लोदगा, पानचिंचोली, गौर, मसलगा, मुगाव, ताजपूर, कलांडी, बुजरुकवाडी, केळगाव येथील महामार्गाच्या बाजूचे हे बसथांबे आता खाली झाले असून समाेरून उंच रस्ता तयार झाला आहे. त्यात काहींची पडझड झाली आहे. त्यामुळे प्रवाशांतून संताप व्यक्त होत आहे.
खालच्या बाजूस हे थांबे झाल्याने आता प्रवासी तिथे थांबण्यास धजावत नाहीत. त्यामुळे लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेले हे प्रवासी थांबे आता उपयोगात येणार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रवाशांतून नाराजी व्यक्त होत आहे.