गाव पुढारी लागले मोर्चे बांधणीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:58 AM2020-12-04T04:58:34+5:302020-12-04T04:58:34+5:30
जळकोट : तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने आणि आता प्रारुप मतदार याद्या प्रसिध्द झाल्याने २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आतापासूनच ...
जळकोट : तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने आणि आता प्रारुप मतदार याद्या प्रसिध्द झाल्याने २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आतापासूनच गाव पुढारी मोर्चेबांधणीस लागले आहेत. त्यामुळे थंडीच्या दिवसांत राजकीय वातावरण तापत असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या महिन्यात तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. आरक्षणामुळे काही ठिकाणी इच्छुकांचा हिरमोड झाला, तर काहींना दिलासा मिळाला. दरम्यान, सरपंच पद नसले तरी उपसरपंचपद आपल्याकडे रहावे म्हणून काही इच्छुकांनी पुन्हा तयारी सुरु केली आहे.
तालुक्यातील २७ पैकी १३ गावांत महिलाराज येणार आहे. तालुक्यात ८ ते १० ग्रामपंचायती मोठ्या आहेत. त्यात रावणकोळा, मरसांगवी, सोनवळा, अतनूर, सुल्लाळी, वांजरवाडा, कुणकी, विराळ ही गावे राजकीय दृष्ट्या महत्त्वाची गणली जातात. त्यामुळे बहुतांश राजकीय मंडळींचा येथील ग्रामपंचायतीवर लक्ष आहे. तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायती काँग्रेस, भाजपाच्या ताब्यात होत्या. दरम्यान, राज्यमंत्री संजय बनसाेडे यांनी विविध योजना राबवून विकास कामांवर भर दिला आहे. तसेच अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी आ. सुधाकर भालेराव यांनीही गाव पातळीवर राजकीयदृष्ट्या फिल्डिंग लावली आहे.
सध्या तालुक्यातील गावांतील चावडी- कट्टयावर राजकीय गप्पा रंगत आहेत. आतापासून इच्छुकांनी मोर्चे बांधणीस सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी निवडणूका रंगतदार होणार असल्याचे दिसून येत आहे.