ग्रामसभा न घेतल्याने ग्रामस्थांनी सरपंचाला कोंडून कार्यालयाला ठोकले कुलूप
By आशपाक पठाण | Published: September 6, 2022 04:53 PM2022-09-06T16:53:32+5:302022-09-06T16:54:22+5:30
गेल्या अडीच वर्षांपासून ग्रामसभा घेण्यात आली नाही.
लातूर: गेल्या अडीच वर्षांपासून ग्रामसभा न घेतल्याने लातूर तालुक्यातील काटगाव गावातील संतप्त ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळी 10.30 ते 11.30 वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयात सरपंचाला कोंडून कुलूप ठोकले.
शासकीय नियमानुसार गावातील समस्यांवर चर्चा करण्यासाठी व विविध विकास योजना राबविण्यासाठी ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे. परंतु गावचे सरपंच दत्ता गायकवाड यांनी गेल्या अडीच वर्षांपासून कसल्याही प्रकारे ग्रामसभा आयोजित न केल्याने मंगळवारी सकाळी संतप्त ग्रामस्थांनी सरपंचांच्या मनमानी कारभाराला कंटाळून ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले व बाहेरून कुलूप लावले.
शिवसेनेचे कार्यकर्ते विशाल शिंदे यांनी या संदर्भात माहिती देऊन सरपंच शासकीय नियमांचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप केला. येत्या गुरुवारी ग्रामसभा घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर सुमारे एक तासानंतर कार्यालयाचे कुलूप काढून सरपंचांना सोडण्यात आले.
"गावातील विकासाचे प्रश्न प्रलंबित आहेत. निकृष्ट दर्ज्याची कामे होत नाहीत आणि ग्रामपंचायत आणि सरपंच याची गांभीर्याने दखल घेत नाहीत आणि लोकांना प्रतिसाद देत नाहीत," असे विशाल शिंदे म्हणाले. अर्जुन लोखंडे, मल्हारी तनपुरे, सागर बोराडे, पंकज पाटील आदींसह गावकऱ्यांची आंदोलनादरम्यान प्रमुख उपस्थिती होती.