रस्त्याच्या खराब अवस्थेने ग्रामस्थ त्रस्त; भांबरी चौकात मनसेचा रास्तारोको
By राजकुमार जोंधळे | Published: October 19, 2022 05:43 PM2022-10-19T17:43:21+5:302022-10-19T17:44:00+5:30
गावात जाणारा मुख्य रस्ता हा अत्यंत खराब झाला असून, रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत.
लातूर : शहरालगत असलेल्या बसवंतपूर-भांबरी मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बुधवारी सकाळी रास्ता राेकाे आंदाेलन करण्यात आले. या आंदाेलनामुळे दाेन्ही बाजूची वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली हाेती.
लातूरालगत असलेल्या बसवंतपूर-भांबरीचा मुख्य रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून उखडला आहे. रस्त्याची अवस्था बिकट झाल्याने वाहनधारक, स्थानिक ग्रामस्थ कमालीचे त्रस्त झाले आहेत. या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे; मात्र त्याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष आहे. बसवंतपूर ते भांबरी मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीसह गावातील मूलभूत सुविधांचा पुरवठा करावा, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस संतोष नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी सकाळी रास्ता रोको आंदाेलन करण्यात आले.
गावात जाणारा मुख्य रस्ता हा अत्यंत खराब झाला असून, रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. पावसाळ्याचे दिवस असल्याने या खड्ड्यात पाणी साचत असल्याने, वाहन चालविणे अवघड झाले आहे. गावातील नागरिकांनी अनेकदा रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे; मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आराेप करण्यात आला. गाव परिसरात व्यापारी, कंपन्यांचे माेठे गाेदाम असून, अवजड वाहनांचीही माेठ्या प्रमाणावर वर्दळ असते. परिणामी, ग्रामस्थ, वाहनधारक, व्यापारीही त्रस्त झाले आहेत. ग्रामस्थांच्या तक्रारीची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दखल घेत बुधवारी रास्ता रोको आंदोलन केले.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे राज्य उपाध्यक्ष भागवत शिंदे, कामगार सेना जिल्हाध्यक्ष अंकुश शिंदे, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष किरण चव्हाण, शहराध्यक्ष मनोज अभंगे, जिल्हा सचिव रवी सूर्यवंशी, सचिन शिरसाट, प्रीती भगत, मारुती लोहोकरे, कृष्णा सारगे, अमर दांडगे, अमित काळुंखे, विशाल बंडे, महेश पिसाटे, राहुल तरोडे, सदाशिव सातपुते यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुणांची उपस्थिती होती.