गावांनी कर भरणा केला अन् राज्यास दिशादर्शक ठरला!
By हरी मोकाशे | Published: February 25, 2023 04:15 PM2023-02-25T16:15:45+5:302023-02-25T16:16:28+5:30
'अभिनव' कर वसुली दिन : ग्रामपंचायतींच्या स्वउत्पन्नात वाढ
- हरी मोकाशे
लातूर : घरपट्टी, नळपट्टी मागणे म्हणजे कुठल्याही गावात वादाची ठेणगी टाकणेच. त्यामुळे वसुली मोहीम तर दूरच. मात्र, जिल्हा परिषदेच्या सीईओंनी 'अभिनव' संकल्पना राबवित गेल्या वर्षीपासून विशेष कर वसुली दिन राबविण्यास सुरुवात केली. त्यामुळे यंदाच्या वर्षात जिल्ह्यात जवळपास ८५ टक्क्यापेंक्षा अधिक कर वसुली झाली आहे. या नाविण्यपूर्ण उपक्रमाची राज्यातील इतर जिल्हा परिषदांनी दखल घेत तिथे सुरुवात केली आहे. त्यामुळे ही मोहीम राज्यासाठी दिशादर्शकच ठरली आहे.
कुठल्याही गावचे बहुतांश नागरिक घरपट्टी, पाणीपट्टी भरण्यास उत्सुक नसतात. त्यामुळे गावात ग्रामपंचायतीस नवीन विकास कामे सुरु करण्यास अडचणी येतात. बहुतांश वेळेस ग्रामपंचायतीचा कुठलाही दाखला देताना कर भरण्यासाठी सूचना केल्या जातात. तेव्हा तडजोड करीत काहीजण थोडाफार भरणा करतात. प्रत्येकाची कर भरण्याची मानसिकता व्हावी म्हणून जिल्हा परिषदेचे सीईओ अभिनव गोयल यांनी गेल्या वर्षीपासून विशेष कर वसुली दिन सुरु केला.
मोहिमेस सुरुवातीस जिल्ह्यातील ७८६ पैकी काही गावांत अल्प प्रतिसाद मिळाला. मात्र, ग्रामपंचायतींचे स्वउत्पन्न वाढविल्याशिवाय गावात काही नवीन उपक्रम राबविणे शक्य नाही. तसेच शासनाच्याच निधीवर अवलंबून राहिल्यास गावचा विकास साधता येणार नाही, हे जिल्हा परिषदेच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी पटवून दिले. नागरिकांनीही महत्त्व जाणून कराच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना आर्थिक बळ देण्यास सुरुवात केली.
५४ कोटींपैकी ४४ कोटींचा भरणा...
जिल्ह्यातील ७८६ ग्रामपंचायतींकडे घरपट्टीपोटी २० कोटी ७४ हजार ६४० तर पाणीपट्टीपोटी ३३ कोटी ६० लाख ५८ हजार असा एकूण ५४ कोटी ३५ लाख २४ हजारांचा कर भरणा अपेक्षित आहे. आतापर्यंत ४४ कोटी ८९ लाख १७ हजारांची वसुली झाली आहे. विशेष म्हणजे, गुरुवारी एकाच दिवसात ४ कोटी २० लाख ५५ हजारांचा नागरिकांनी भरणा केला.
राज्यातील जिल्ह्यांनी सुरु केला उपक्रम...
लातूर जिल्हा परिषदेचा हा विशेष कर वसुलीचा यशस्वी उपक्रम राज्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, उस्मानाबाद, सोलापूर व अन्य काही जिल्ह्यांनी सुरु केला आहे. त्यामुळे तो संपूर्ण राज्यासाठी पथदर्शी ठरत आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील नागरिक आता स्वत:हून कर भरणा करीत आहेत.