शासकीय कार्यालयात कर्तव्यावर कोटपा कायद्याचे उल्लंघन; सात जणांवर दंडात्मक कारवाई
By हणमंत गायकवाड | Published: May 27, 2024 07:48 PM2024-05-27T19:48:49+5:302024-05-27T19:55:34+5:30
लातूर जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाच्या अचानक शासकीय कार्यालयात धाडी
लातूर: शासकीय कार्यालयात कर्तव्यावर असताना तंबाखूयुक्त पदार्थांचे सेवन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शनिवारी धाडी टाकण्यात आल्या असून यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, तंबाखू विरोधी कायद्यानुसार (कोटपा-२००३) सात जणांवर यावेळी दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शिवाय,कार्यालय प्रमुखांना पावती पुस्तक देऊन तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.
लातूर शहरामध्ये तंबाखू नियंत्रण अंमलबजावणी पथकाच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालय, शिक्षण अधिकारी माध्यमिक कार्यालय, सर्व शिक्षा अभियान कार्यालय व परिसरात कारवाई करण्यात आली. पान, सुपारी, गुटखा खाऊन थुंकणाऱ्यावर कारवाई करण्यात आली. राज्यात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विरोधी कायदा कोटपा २००३ नुसार पालन करणे बंधनकारक आहे. उल्लंघन करणाऱ्यामुळे सरकारी मालमत्तेचे नुकसान होते. तसेच जे खात नाहीत, त्यांच्या आरोग्यावर घातक परिणाम होतो. यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब असून आपल्या युवा पिढीला यापासून वाचविण्यासाठी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात येत आहे.
कार्यालय प्रमुखांनी कारवाई करावी....
कार्यालय प्रमुखांनी आपल्या अंतर्गत असलेले कर्मचारी, अधिकारी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खात असतील तर त्यांच्यावर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. ३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिन आहे. त्यासाठी जिल्हा तंबाखूमुक्त करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांचे आहेत. सार्वजनिक ठिकाणी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाणे,बाळगणे विक्री करणे, कायद्यानुसार गुन्हा आहे. त्यामुळे कार्यालय प्रमुखांनी त्यांचे कार्यालय तंबाखूमुक्त ठेवले पाहिजे. जे खातात त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश आहेत.
यांच्या पथकाने केली कारवाई......
जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाच्या पथकामध्ये डॉ. माधुरी उटीकर, बोंबरे, कृष्णा राठोड, दीपक पवार यांचा समावेश होता. या पथकाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमान वडगावे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यालयांना भेटी देऊन कार्यालय प्रमुखांना पावती पुस्तक दिले.तसेच तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करताना आढळलेल्या सात जणांवर दंडात्मक कारवाई केली.
तंबाखूजन्य पदार्थ बाळगणे कायद्याने गुन्हा..
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सार्वजनिक ठिकाणी बाळगणे, विक्री करणे, खाणे, थूंकणे कायद्यानुसार गुन्हा आहे.कार्यालय प्रमुखांनी आपले कार्यालय तंबाखूमुक्त ठेवले.पाहिजे जे खातात त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी,असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांचे आहेत.त्यानुसार या मोहिमे अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे.