सेंद्रीच्या गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार
By admin | Published: February 16, 2017 07:19 PM2017-02-16T19:19:08+5:302017-02-16T19:19:08+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदानावर अहमदपूर तालुक्यातील सेंद्री (सुनेगाव) येथील मतदारांनी बहिष्कार घातला.
Next
ऑनलाइन लोकमत
अहमदपूर, दि. 16 - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदानावर अहमदपूर तालुक्यातील सेंद्री (सुनेगाव) येथील मतदारांनी बहिष्कार घातला. शंभर मतदार असलेल्या या गावातील एकाही मतदाराने मतदान केले नाही. रस्ता होत नसल्याने मतदारांनी बहिष्कार घालून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
अहमदपूर तालुक्यातील सेंद्री (सुनेगाव) हे दीडशे ते दोनशे लोकसंख्या असलेले गाव आहे. या गावात एकूण शंभर मतदार आहेत. या गावाला तालुक्याला येण्यासाठी रस्ताच नाही. सुमठाणा मार्गे १४ कि.मी. अंतर पार करून तालुक्याला यावे लागते. आनंदवाडीमार्गे केवळ पाच कि.मी. अंतर आहे. त्यामुळे आनंदवाडी मार्गे तालुक्याला जाण्यासाठी रस्ता करावा, अशी गावकऱ्यांची २००८ पासून मागणी आहे. सेंद्री, सुनेगाव व शेणी या तीन गावांची ग्रुप ग्रामपंचायत असून, आनंदवाडी गावातून मन्याड नदीवर पूल बांधून रस्ता करण्याची मागणी सातत्याने गावकरी करीत आहेत. माजी आ. बब्रुवान खंदाडे यांच्या काळात पुलाचे काम झाले. परंतु, रस्ता झाला नाही. विद्यमान आ. विनायकराव पाटील यांच्याकडेही गावकºयांनी रस्त्याची मागणी केली. काही शेतकºयांच्या शेतातून हा रस्ता जातो. त्यामुळे आमदार पाटील यांनी गावकरी आणि शेतमालकांची बैठक घेऊन समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, संबंधित शेतमालकाने रस्त्यासाठी जमीन दिली नाही. त्यामुळे रस्त्याचा प्रश्न जैसे थे आहे. यामुळे गावकऱ्यांनी गुरुवारी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदानावर बहिष्कार टाकून प्रशासनाचा निषेध केला.
सेंद्री गावातील मतदारांचा बहिष्कार असल्याचे समजताच उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, तहसीलदार प्रवीण मेंगशेट्टी, उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक, पोलीस निरीक्षक सालार चाऊस यांनी गावास भेट देऊन गावकºयांची समजूत घातली. मात्र गावकरी आपल्याच भूमिकेवर ठाम राहिले. मतदानाची ५.३० ची वेळ संपली तरी एकाही मतदाराने मतदान केले नाही.
गावकरी म्हणाले, पावसाळ्यात गावाचा संपर्क तुटतो...
पावसाळ्यात मोठा पाऊस झाल्यास गावाचा संपर्क तुटतो. त्यामुळे गावकऱ्यांची मोठी अडचण होते. रस्ता नसल्यामुळे दर पावसाळ्यात संपर्क तुटून गावकऱ्यांची गैरसोय होते. ही बाब वारंवार प्रशासनासमोर मांडण्यात आली. तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. मात्र रस्ता झाला नसल्यामुळे आम्ही मतदानावर बहिष्कार घातला. शंभर मतदारांपैकी एकाही मतदाराने मतदान केले नसल्याचे गावकºयांनी सांगितले.