'विष्णूभक्त श्वेतपद्मी सती गेली !' ताडमुगळीत आढळला ६०० वर्षांपूर्वीचा दुर्मिळ शिलालेख
By राजकुमार जोंधळे | Published: November 1, 2022 07:33 PM2022-11-01T19:33:44+5:302022-11-01T19:34:38+5:30
इ.स. १४१७ मधील सती शिळा शिल्पामधून नवीन माहिती उघड
कासार बालकुंदा (जि. लातूर) : निलंगा तालुक्यातील ताडमुगळी गावात हनुमान मंदिरानजीक एक सती शिळा शिल्प आढळून आले आहे. या गावाला इतिहास अभ्यासक कृष्णा गुडदे आणि पुरातत्व अभ्यासक सचिन पवार यांनी भेट दिली असता, त्यांना या सतीशिळा शिल्पावर शिलालेख आढळून आला.
कृष्णा गुडदे यांनी याचे ठसे घेऊन वाचन आणि संशोधन केले असता, महत्वपूर्ण इतिहासाचा प्रथमच उलगडा झाला. सतीशिळा म्हणजे पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या चितेवर स्वतः जळून मरण स्विकारणाऱ्या स्त्रीच्या स्मृतीमध्ये उभारलेली शिल्पशिळा होय. तत्कालीन समाजात सती जाणे हे पुण्यवत आणि सर्वमान्य होते. सतीशिळा शिल्प अनेक ठिकाणी आढळतात, मात्र त्यावर शिलालेख कोरलेला नसतो त्यामुळे सती गेलेल्या स्त्रीबाबत माहिती उपलब्ध होत नाही. शिलालेख असलेल्या सती शिळा शिल्प दुर्मिळ असतात. या सतीशिळा शिल्पावर सती स्त्रीचा आशिर्वाद मुद्रेतील कोपरातून दुमडलेला हात दाखवला आहे. त्याचबराेबर सूर्य, चंद्र, शिवपिंड, पती-पत्नी हात जोडून, पुष्प, घोड्यावर बसलेली ती स्त्री असे शिल्प त्यावर कोरलेले आहेत. शिवाय, बाजूला शिलालेख कोरलेला आहे.
शिलालेख १२ ओळींचा असून देवनागरी लिपी व मराठी भाषेत खोदीव अक्षरे असलेला आहे. शिलालेखात सुरुवातीस लक्ष्मीपती म्हणजेच विष्णूला नमन केले आहे. शके १३३९ हेमलंब संवत्सरे कार्तिक शुध्द अष्टमी सोमवार अशी तिथी आली असून ती तारीख पिल्ले जंत्री नुसार १८ ऑक्टोबर १४१७ सोमवार अशी येते. या तिथीला भारद्वाज गोत्र असलेला महादेवचा पुत्र श्रीपती त्याची धर्म पत्नी श्वेतपद्मी ही वेकुंटवासी झाली म्हणजेच ती सती गेली असे शिलालेखात लिहिले आहे.
ही सती स्त्री विष्णू भक्त असल्याचे समजते. तिच्या आठवणीत ही सती शिळा घडवलेली आहे. या माहिती वरून तत्कालीन समाजातील चालीरीती व तत्कालीन इतिहास समजण्यास मदत झाली आहे. या सती शिळा लेखाचे महत्व अनन्य साधारण असून या उपलब्धी व वाचनाने इतिहासात महत्वपूर्ण भर पडली आहे. या कामात सचिन पवार व अमोल बनकर यांची मदत झाली आहे.