उमेदवारांच्या प्रचारासाठी शेत-शिवारातील कोपींना भेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:49 AM2021-01-13T04:49:33+5:302021-01-13T04:49:33+5:30

वेळ अमावस्या या सणाला लातूर, उस्मानाबादसह कर्नाटक व तेलंगणातील काही भागांत अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी बळीराजा सहकुटुंब आपल्या ...

Visits to the farms for campaigning of candidates | उमेदवारांच्या प्रचारासाठी शेत-शिवारातील कोपींना भेटी

उमेदवारांच्या प्रचारासाठी शेत-शिवारातील कोपींना भेटी

Next

वेळ अमावस्या या सणाला लातूर, उस्मानाबादसह कर्नाटक व तेलंगणातील काही भागांत अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी बळीराजा सहकुटुंब आपल्या काळ्या आईप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेत-शिवारात दाखल होतात. या वर्षी ऐन सणासुदीच्या दिवसात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामुळे गावपातळीवरील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान, प्रचारासाठी शेवटचे दोनच दिवस शिल्लक राहिल्याने उमेदवारांनी नामी शक्कल लढवत वेळ अमावस्यानिमित्त मंगळवारी शेत-शिवारातील फेऱ्या व बैठका वाढविल्या आहेत. कोपींना भेटी देत भज्जी, रोडगा, अंबिल-खिचड्यावर ताव मारत मतदानासाठी साकडे घालत आहेत. कृषी संस्कृतीतील या उत्सवास कामधंद्यानिमित्त व नोकरीसाठी मोठ्या शहरात स्थायिक असलेले मंडळी सहकुटुंब गावाकडे न विसरता येतात. वेळ अमावस्या व मकरसंक्रांत हे दोन्ही सण एकापाठोपाठ आल्याने अनेक चाकरमानी गावात निवडणुकीपूर्वीच दाखल झाले आहेत. या सर्वांना शेत-शिवारात भेटून उमेदवारांनी मतदानासाठी साकडे घातले आहे. यामुळे शेत-शिवार दिवसभर माणसांनी फुलून गेले होते. अबालवृद्ध व महिलांनी दिवसभर शेतातील रानमेव्याचा आस्वाद घेत पतंग व झोक्याचा मनमुराद आनंद घेतला. यामुळे मंगळवारी दिवसभर गावा-गावात अघोषित संचारबंदी असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. तर शेत-शिवार माणसांनी फुलून गेले होते.

Web Title: Visits to the farms for campaigning of candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.