दुभंगलेले ओठ, टाळूच्या शस्त्रक्रियेत डॉ. विठ्ठल लहानेंचे कार्य कौतुकास्पद : जिल्हाधिकारी

By आशपाक पठाण | Published: December 10, 2023 06:37 PM2023-12-10T18:37:15+5:302023-12-10T18:38:46+5:30

दुभंगलेले ओठ व टाळू या जन्मजात व्यंगावरील उपचाराविषयीच्या जनजागृतीसाठी रविवारी शाम मंगल कार्यालयात मेळावा झाला.

Vitthal Lahane work commendable says Collector Varsha Thakur Ghuge | दुभंगलेले ओठ, टाळूच्या शस्त्रक्रियेत डॉ. विठ्ठल लहानेंचे कार्य कौतुकास्पद : जिल्हाधिकारी

दुभंगलेले ओठ, टाळूच्या शस्त्रक्रियेत डॉ. विठ्ठल लहानेंचे कार्य कौतुकास्पद : जिल्हाधिकारी

लातूर : दुभंगलेले ओठ, टाळूच्या शस्त्रक्रिया अत्यंत महागड्या होत्या. शिवाय, यासाठी मोठ्या शहरांमध्ये जावे लागत होते. मात्र, डॉ. विठ्ठल लहाने यांनी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत प्लास्टिक सर्जरीचा लाभ दिला. त्यांनी शस्त्रक्रियेतून हजारो मुलांच्या चेहऱ्याला रूप देण्याचे काम केले. त्यांचे हे काम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. वर्षा ठाकूर-घुगे यांनी येथे केले.

दुभंगलेले ओठ व टाळू या जन्मजात व्यंगावरील उपचाराविषयीच्या जनजागृतीसाठी लातूर जिल्ह्यातील आशा गटप्रवर्तक, आशा कार्यकर्तींचा मेळावा रविवारी शाम मंगल कार्यालयात झाला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे, बालरोग तज्ज्ञ डॉ. वर्धमान उदगीरकर, प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठल लहाने, डॉ. कल्पना लहाने यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी ठाकूर म्हणाल्या, श्रीमंतांची समजली जाणारी सर्जरी, डॉ. लहाने यांनी अगदी गरिबातल्या गरीब गरजूपर्यंत पोहोचवली आहे. त्यांच्यामुळे या भागातील हजारो रुग्णांना याचा लाभ झाला आहे. लहाने हॉस्पिटल व स्माइल ट्रेन यांच्या संयुक्त विद्यमाने मागील १९ वर्षांपासून या व्यंगावर वर्षभर मोफत प्लास्टिक सर्जरीचा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत ९ हजार ९०६ शस्त्रक्रिया पूर्ण केल्या आहेत, ही बाब वाखाणण्याजोगी आहे.

पोलिस अधीक्षक सोमय मुंडे म्हणाले, आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो हा विचार करून डॉ. विठ्ठल लहाने व त्यांची टीम, ह्या गरीब गरजू रुग्णांसाठी कार्य करत आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. सीईओ सागर म्हणाले, "दुभंगलेले ओठ व टाळू या व्यंगावर मोफत सर्जरी लातूर येथे होत आहेत ही बाब खूप समाधान देणारी आहे. आमच्या सर्व आशा कार्यकर्त्या व गटप्रवर्तक अशा व्यंगाचे रुग्ण शोधून ते आपल्यापर्यंत पाठवतील आणि आपल्या ह्या कार्यास शंभर टक्के मदत करतील. डॉ. वडगावे यांनी मनोगत व्यक्त केले.

लवकर शस्त्रक्रिया करणे आवश्यक...

दुभंगलेले ओठ व टाळूच्या रुग्णांची लवकर शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. अशा रुग्णांची काळजी कशी घ्यावी, जन्मानंतर दूध कसे पाजावे याविषयी डॉ. उदगीरकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच डॉ. विठ्ठल लहाने यांनी मोफत शस्त्रक्रियेची माहिती दिली. आभार डॉ. कल्पना लहाने यांनी मानले.

Web Title: Vitthal Lahane work commendable says Collector Varsha Thakur Ghuge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.