जय हरी विठ्ठल, समर्थ धोंडूतात्या महाराज की जय; आषाढी यात्रेनिमित्त भाविकांची दर्शनासाठी रिघ
By हरी मोकाशे | Updated: July 17, 2024 18:32 IST2024-07-17T18:31:55+5:302024-07-17T18:32:29+5:30
श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांच्या दर्शनासाठी अनेक भाविक अनवाणी पायी चालत येत होते.

जय हरी विठ्ठल, समर्थ धोंडूतात्या महाराज की जय; आषाढी यात्रेनिमित्त भाविकांची दर्शनासाठी रिघ
डोंगरशेळकी (लातूर) : टाळ- मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठल विठ्ठल जय हरी, समर्थ धोंडूतात्या महाराज की जय अशा जयघोषात आषाढी यात्रेनिमित्ताने जवळपास दोन लाख भाविकांनी मराठवाड्याचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंगरशेळकी येथील श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांच्या समाधीचे बुधवारी दर्शन घेतले.
उदगीर तालुक्यातील डोंगरशेळकी येथील श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांच्या समाधी स्थळास तीर्थक्षेत्राचा ब दर्जा आहे. आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी भाविकांची दर्शनासाठी रीघ असते. बुधवारी पहाटे ५ वाजता उदगीरचे उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे व सुविद्य पत्नी स्वाती शिंदे यांच्या हस्ते श्री धोंडूतात्या महाराजांच्या समाधी महापूजा व आरती करण्यात आली. त्याचबरोबर वारकरी बाबुराव मधुकरराव पाटील यांना महापुजेचा मान मिळाला. यावेळी मंदिराचे विश्वस्त व्यंकटराव मुंढे, बाबुराव घटकार, पुजारी अनिल कुलकर्णी, पोलिस पाटील भालचंद्र शेळके, चेअरमन हणमंतराव मुंढे, माजी सरपंच मारोतीराव मुंढे, ज्ञानोबा मुंढे, व्यंकटराव मरलापल्ले, बालाजी मुंढे, जनार्दन मुंढे, गणेश मुंढे, तलाठी दत्तात्रय मोरे आदी उपस्थित होते. दुपारी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी पूजा व आरती करुन दर्शन घेतले. तत्पूर्वी माजी आ. सुधाकर भालेराव यांनी दर्शन घेतले.
यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची माहिती मंत्री बनसोडे यांनी दिली. याप्रसंगी सिध्देश्वर पाटील, तहसीलदार राम बोरगावकर, पं.स. माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, प्रा. शाम डावळे, वसंत पाटील, बालाजी भोसले, दत्ता बामणे आदी उपस्थित होते.
अनवाणी पायी येऊन घेतले दर्शन...
श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांच्या दर्शनासाठी अनेक भाविक अनवाणी पायी चालत येत होते. श्री समर्थ धोंडूतात्या महाराज की जय जय, विठ्ठल विठ्ठल जय हरी असा जयघोष करीत दिंड्या येत होत्या. त्यामुळे मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. भाविकांसाठी मंदिर संस्थान व अभिजित गायकवाड यांच्या वतीने मोफत फराळ व पाण्याची सोय करण्यात आली होती. येथील धोंडूतात्या विद्यालयाच्या वतीने दिंडी काढण्यात आली होती.
प्रवाशांच्या सेवेसाठी बसेस...
यात्रेनिमित्ताने भाविकांच्या सेवेसाठी उदगीर आगाराच्या वतीने बसेस सोडण्यात आल्या होत्या. दिवसभरात १२० फेऱ्या झाल्या. यावेळी आगारप्रमुख चिनमय चिटणीस, वाहतूक नियंत्रक सचिन पटवारी, प्रदीप काळे उपस्थित होते. वाढवणा ठाण्याचे सपोनि. भीमराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आरोग्य विभागाकडून सेवा...
भाविकांना आरोग्य सेवा देण्यासाठी गुडसूर प्राथमिक आरोग्य केंद्र व डोंगरशेळकीतील उपकेंद्राचे पथक होते. डॉ. अनुजा दाताळ, डॉ. अमित देवकते, एम.एन. वजिरे, सुलोचना मुंडे, सुभाष राठोड आदींनी भाविक रुग्णांना सेवा दिली. तसेच रक्तदान शिबीर घेण्यात आले.