लातूर जिल्ह्यात भूकंपाचे तीन सौम्य धक्के, नऊ गावांमध्ये भूगर्भातून आवाज !
By राजकुमार जोंधळे | Published: September 24, 2022 06:23 AM2022-09-24T06:23:31+5:302022-09-24T06:24:41+5:30
प्रशासन सतर्क : ग्रामस्थांनी घाबरू नये - जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.
राजकुमार जोंधळे / लातूर
लातूर : नऊ गावांमधून भूगर्भातून आवाज आले. दरम्यान, तीन सौम्य धक्के झाल्याची अधिकृत माहितीही समोर आली. यासंदर्भात जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी पत्रपरिषद घेऊन ग्रामस्थांना घाबरू नये, असा दिलासा दिला आहे. तसेच प्रशासन सतर्क असून, आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार केला असल्याचे स्पष्ट केले.
हासोरीसह अन्य गावांतील भूगर्भातील आवाज हे सौम्य धक्के होते, हे समोर आलेले आहे. त्यामुळे औराद आणि आशिव या ठिकाणी भूकंपमापन यंत्र बसविण्यात आले आहे. त्यावरून सूक्ष्म निरीक्षण केले जात आहे. दिल्लीच्या राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भूगर्भशास्त्राचे अभ्यासक यावर लक्ष ठेवून आहेत. ग्रामस्थांमध्ये जनजागरणाचे कार्य नियमित सुरू असून, गावातील तरुणांनी पुढाकार घेऊन भीती पसरणार नाही, याची काळजी घ्यावी.
हासोरीत पहिल्यांदा आले आवाज...
६ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजून १२ मिनिटांनी हासोरी गावात भूगर्भातून आवाज आले. ग्रामस्थ घरांमधून बाहेर पडले. अनेकांनी पशुधन सुरक्षितस्थळी हलविले होते. त्याच दिवशी सायंकाळी ७.३० वाजताही सौम्य धक्का जाणवल्याचे ग्रामस्थांनी सांगितले होते. तसेच १२ सप्टेंबरला रात्री १० वाजून ७ मिनिटांनी अनेकांना आवाज आणि हादरा जाणवला होता. अद्यापपर्यंत भूगर्भातील हालचालींमुळे, पोकळी निर्माण झाल्याने आवाज येत असावेत, अशी मांडणी केली जात होती. परंतु, भूकंपमापन केंद्रावर नोंद झाल्याने गेल्या काही दिवसांपासून हासोरीसह नऊ गावांमध्ये झालेले आवाज भूकंपाचे सौम्य धक्केच असल्याचे स्पष्ट होत आहे.
आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण...
निलंगा तालुक्यातील ज्या गावांमध्ये भूगर्भातून आवाज जाणवले, त्या गावांमध्ये प्रशासन पोहोचले आहे. स्थानिक अधिकारी सतत संपर्कात आहेत. सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांच्यासह त्या-त्या गावांतील प्रमुख व्यक्तींचे सहकार्य घेऊन आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जात आहे. लोकांनी घाबरून जाऊ नये, यासाठीही समुपदेशन केले जात आहे. धोकादायक घरांचे सर्वेक्षण केले जात आहे. लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध नागरिक यांची माहिती संकलित करून सुरक्षित स्थळांचा आढावा घेतला आहे.
- पृथ्वीराज बी.पी., जिल्हाधिकारी