हासोरीसह सहा गावांत भुगर्भातून आवाज; निलंगा तालुक्यातील आठ दिवसांत तिसरी घटना
By आशपाक पठाण | Published: September 13, 2022 12:03 AM2022-09-13T00:03:21+5:302022-09-13T00:04:26+5:30
परिसरातील लोक भयभीत झाले असून भूकंप असल्याच्या भीतीने लोक रस्त्यावर रात्र काढत आहेत.
निलंगा (जि. लातूर) : तालुक्यातील हासोरीसह सहा गावात सोमवारी रात्री १० वाजून ७ मिनिटाला पुन्हा जमीनीतून आवाज आला. त्यामुळे परिसरातील लोक भयभीत झाले असून भूकंप असल्याच्या भीतीने लोक रस्त्यावर रात्र काढत आहेत. प्रशासन मात्र भूकंप नसल्याचा दावा करून हात झटकून मोकळे होत आहेत. प्रशासनाने गांभीर्याने या घटनेची दखल घ्यायला हवी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
मागील आठ दिवसांत तिसर्यांदा हा प्रकार घडला आहे. हासोरी गाव परिसरातील गावात ६ व ८ सप्टेंबरला भूगर्भातून आवाज येऊन भूकंप झाले असल्याचे जाणवल्याची माहिती गावकऱ्यांनी प्रशासनाला दिली असता लातूर येथील भूगर्भ शास्त्रज्ञांनी भेट देऊन लोकांशी चर्चा केली. हा भूकंप नाही, तशी कोणतीही नोंद झालेली नाही. त्यामुळे लोकांनी घाबरू नये असे सांगितले. पण सोमवारी रात्री १०.०७ वाजता मोठा आवाज झाल्याने लोक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर येऊन आरडाओरड करीत आहेत.
भूगर्भातील आवाज घरात झोपू देईना, पाऊस घराबाहेर पडू देईना !
लोक भीतीपोटी घरी झोपायला तयार नाहीत. वारंवार पाऊस चालू असल्याने बाहेर ही झोपू शकत नाहीत व भूगर्भातील आवाजामुळे घरात ही झोपू शकत नाही अशा अवस्थेत अर्धेगाव जागी राहून एकमेकाचे राखण करीत आहे. सोमवारी रात्री हासोरीसह ऊस्तूरी, बडूर, हरी जवळगा, भूतमुगळी, बोळेगाव या गावातही आवाज जाणवला असल्याची माहिती ज्ञानेश्वर बरमदे यांनी दिली. नक्की हा काय प्रकार होत आहे यासाठी तज्ञ लोकांना पाचारण करणे गरजेचे आहे, अशी मागणी हासोरीच्या नागरिकांनी केली आहे. मागील आठ दिवसांत तिसर्यांदा हा प्रकार झाला असल्याचे नागरिकांनी सांगितले.