मालवाहतूक वाहनांच्या फिटनेसची प्रतीक्षा; लातूरमध्ये कोटा वाढविला, शनिवारही कामकाज
By आशपाक पठाण | Published: October 12, 2022 08:15 PM2022-10-12T20:15:46+5:302022-10-12T20:15:54+5:30
वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी लातूरच्या आरटीओ कार्यालयात शनिवारी सुटीच्या दिवशीही फिटनेसचे काम होणार आहे. शिवाय, ऑनलाइन कोटाही वाढला आहे.
लातूर : सोयाबीनची काढणी, साखर कारखाने सुरू होत असल्याने लातूरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात मालवाहतूक करणारी वाहने योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण (फिटनेस) साठी येणाऱ्या अर्जांची संख्या वाढली आहे. ऑनलाइन बुकिंग नोव्हेंबर महिन्यात होत असल्याने वाहनधारकांना महिन्याची वेटिंग होत आहे. वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी लातूरच्या आरटीओ कार्यालयात शनिवारी सुटीच्या दिवशीही फिटनेसचे काम होणार आहे. शिवाय, ऑनलाइन कोटाही वाढला आहे.
लातूर जिल्ह्यात सोयाबीन काढणी सुरू झाली आहे. त्याचबरोबर साखर कारखानेही सुरू होेत असल्याने माल वाहतूक करणारे व कारखान्यांना ऊस वाहतूक करणारे ट्रक, ट्रॅक्टर व इतर वाहनांची योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी अर्जांची संख्या वाढली आहे. त्यामुळे ऑनलाइन बुकिंग करताना महिनाभराची प्रतीक्षा करावी लागत आहे. यामुळे परिवहन संवर्गातील वाहने व सर्व मालवाहतूक वाहने योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये यांनी कोटा वाढविला आहे. तसेच महिन्याच्या प्रत्येक शनिवारी (शासकीय सुटी दिवशी) देखील लातूरच्या परिवहन कार्यालयात फिटनेसचे काम केले जाणार आहे.
एक दिवस आधी करा नोंदणी...
शनिवारी शासकीय सुटी असते. तरीही लातूरच्या आरटीओ कार्यालयात मालवाहतूक वाहनांच्या फिटनेसचे काम केले जाणार आहे. मालवाहतूक करणारी वाहने ज्यात मुख्यत्वे सोयाबीन, ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्राधान्य दिले जाणार आहे. ज्यांना शनिवारी फिटनेस करून घ्यावयाचे आहे, अशा वाहनधारकांनी शुक्रवारी कार्यालयात येऊन नोंदणी करणे गरजेचे आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये यांनी दिली.