नववर्षात ‘वंदे भारत’ची प्रतीक्षा! लातुरातील फॅक्टरीत बांधणी; पुरवठा मात्र हाेतोय देशभर...
By राजकुमार जोंधळे | Published: January 1, 2024 08:26 AM2024-01-01T08:26:18+5:302024-01-01T08:27:41+5:30
लातूरकरांना ‘वंदे भारत’ची नववर्षातही प्रतीक्षाच आहे. हे स्वप्न कधी साकार हाेणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
राजकुमार जाेंधळे, लातूर : बार्शी मार्गावर असलेल्या विस्तारित एमआयडीसी परिसरात मराठवाडा रेल्वे काेच फॅक्टरीची उभारणी करण्यात आली आहे. प्रायाेगिक तत्त्वावर काही रेल्वे काेचची निर्मिती करण्यात आली असून, मराठवाड्यात शनिवारी जालना येथून मुंबईच्या दिशेने ‘वंदे भारत’ सुसाट धावली. ज्या लातुरातील कारखान्यात वंदे भारतच्या डाब्यांची निर्मिती केली जात आहे, त्याच लातूरकरांना ‘वंदे भारत’ची नववर्षातही प्रतीक्षाच आहे. हे स्वप्न कधी साकार हाेणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. ‘वंदे भारत रेल्वेच्या डब्यांची बांधणी लातुरात आणि पुरवठा मात्र देशभर...’ अशीच परिस्थिती सध्या झाली आहे.
लातूर येथील डब्यांची निर्मिती करणारा देशातील चाैथा कारखाना आहे. २०२१मध्ये ताे तयार झाला असून, डब्यांच्या निर्मितीसाठी सक्षम झाला आहे. मात्र, पुरेशा कुशल मनुष्यबळाचा अभाव असल्याने या फॅक्टरीला अजूनही डब्यांच्या निर्मितीची प्रतीक्षा आहे. खासगी कंपनीशी करार करण्यात आले आहेत. देशात चार ठिकाणी रेल्वे डब्यांची निर्मिती करणारे कारखाने आहेत. यात तामिळनाडू येथील चेन्नई, पंजाब राज्यात कपूरथळा, उत्तर प्रदेशात रायबरेली आणि महाराष्ट्रातील लातूर येथील कारखान्यांचा समावेश आहे. यातील चैन्नई येथील काेच फॅक्टरी १९५५मध्ये, तर कपूरथळा येथील फॅक्टरी १८९६ मध्ये उभारण्यात आली आहे. रायबरेली येथे २००९ फॅक्टरी उभारली असून, महाराष्ट्रातील लातूर येथे चाैथी मराठवाडा काेच फॅक्टरी उभारण्यात आली आहे.
लातुरातील काेच फॅक्टरीची वैशिष्ट्ये...
लातूर शहरापासून १८ किलाेमीटर अंतरावर लातूर काेच फॅक्टरी ३५० एकर क्षेत्रात उभारली आहे. यापैकी १२० एकरावरील बांधकाम १०० टक्के पूर्ण झाले आहे. पहिल्या फेजमध्ये वर्षाला २५० डबे, तर दुसऱ्या फेजमध्ये वर्षाला ४०० डब्यांची आणि तिसऱ्या फेजमध्ये ७०० डब्यांची निर्मिती करण्याचे नियाेजन आहे.
जनरल मॅनेजर घेणार स्पीड ट्रायल...
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जनरल मॅनेजर स्पीट ट्रायल घेणार आहे. त्यानंतर यातील तांत्रिक बाबींचा विचार करून, वंदे भारतबाबत विचार केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. गत अनेक दिवसांपासून लातूर-मुंबई रेल्वे मार्गावर ‘वंदे भारत’ रेल्वेची मागणी आहे.