महावितरणच्या उपविभागीय कार्यालयाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:34 AM2020-12-16T04:34:54+5:302020-12-16T04:34:54+5:30
गत अनेक वर्षांपासून या ना त्या कारणामुळे जळकोट येथील प्रस्तावित महावितरणचे उपविभागीय कार्यालय चर्चेत आहे. अगोदर मंजूर असलेले ...
गत अनेक वर्षांपासून या ना त्या कारणामुळे जळकोट येथील प्रस्तावित महावितरणचे उपविभागीय कार्यालय चर्चेत आहे. अगोदर मंजूर असलेले जळकोटचे कार्यालय अहमदपूर तालूक्यातील शिरुर ताजबंदला पळविण्यात आल्याने, तालुक्यातील नागरिकांत तीव्र संताप आहे. जळकाेटला लवकरात लवकर सदरचे कार्यालय मंजूर व्हावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. जळकोट तालुक्यातील जनतेला शेतीपंपाचे डिमांड भरणे, विजबिल दुरुस्तीसह इतर कामांसाठी तब्बल ६० किलोमीटरचे अंतर पार करत अहमदपूर तालुक्यात जावे लागत आहे.
महाविकास आघाडीच्या सरकारने जळकोट तालुक्याचे वीज मंडळाचे कार्यालय तातडीने सुरु करावे, अशी मागणी जळकाेट तालुक्यातील ४७ गवाच्या सरपंच, चेअरमन आणि शेतकऱ्यांनी केली आहे. सन २०१५ मध्ये तत्कालीन ऊर्जामंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यकाळात जळकोट तालुक्याला सदरचे कार्यालय मंजूर झाले होते. शिवाय, या कार्यालयाच्या कामाचा उद्घाटनाचा मुहूर्तही ठरला हाेता. मात्र, अचानकपणे सदरचे कार्यालय शिरुर ताजबंदला गेल्याने जळकोटकरांची निराशा झाली.
राज्यमंत्र्यांनी हा प्रश्न साेडवावा...
जळकाेट तालुक्यातील प्रत्येक नागरिकांना वीजेबाबतच्या किरकाेळ तक्रारीबाबत, दुरुस्तीबाबत नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अतिशय क्षुल्लक कामासाठीही जळकाेट येथून शिरुर ताजबंद येथे जावे लागत आहे. तालुक्याला महावितरणचे उपविभागीय कार्यालय नाही असा महाराष्ट्रात एकही तालुका नाही. मात्र, जळकाेट तालुक्यात हे कार्यालय अद्यापही अस्तित्वात नाही. यासाठी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी जळकोट तालुक्यातील नागरिकांच्या भावना समजून घेत, हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी हाेत आहे.