पावसात झाडाखाली थांबणे जिवावर बेतले; वीज पडून शेतमजुराचा मृत्यू, दोघे जखमी
By संदीप शिंदे | Published: August 14, 2024 06:28 PM2024-08-14T18:28:31+5:302024-08-14T18:30:22+5:30
देवणी तालुक्यातील हिसामनगर (माटेगडी) येथील घटना
वलांडी (जि. लातूर) : पाऊस सुरू असताना झाडाखाली थांबणे मजुराच्या जिवावर बेतले आहे. देवणी तालुक्यातील हिसामनगर (माटेगडी) येथे बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास वीज पडून एका शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर दोघे जण जखमी झाले आहेत.
हिसामनगर येथील शेतमजूर संदीप केशव वाघमारे (वय ३५) हे शेती कामासाठी कल्याण मिरकले यांच्या शेतात गेले होते. बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास झालेल्या पावसात तिघेजण शेतातील झाडाखाली थांबले होते. यादरम्यान, वीज पडल्याने संदीप वाघमारे हा जागीच मयत झाला. तर अन्य दोघांना विजेची झळ बसल्याची माहिती सरपंच विजयकुमार मुके, पोलिस पाटील विलास पाटील यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच मंडळाधिकारी बालाजी केंद्रे व तलाठी यांनी घटनेचा पंचनामा केला. मयत संदीप वाघमारे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, असा परिवार असून त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
एका जखमींवर उपचार सुरु...
पाऊस सुरु असल्याने तिघेजण झाडाखाली थांबले होते. त्याचवेळी वीज पडल्याने एकाचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले आहेत. यातील जखमी दत्तू माधव येदले यांना वलांडी येथे प्रथमोपचार करुन उदगीर येथील दवाखान्यात पाठविण्यात आले. दरम्यान मयताच्या वारसास नुकसान भरपाई देण्याची मागणी सरपंच सपना विजयकुमार मुके यांनी प्रशासनाकडे केली आहे.