निलंग्यात गरजूंच्या मदतीसाठी माणुसकीची भिंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:22 AM2021-02-05T06:22:06+5:302021-02-05T06:22:06+5:30
शहरातील जाकीर हुसेन या संस्थेच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात. त्यात आणखीन एक नवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ...
शहरातील जाकीर हुसेन या संस्थेच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात. त्यात आणखीन एक नवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सामाजिक बांधिलकीची कपडा भिंत तयार केली आहे. शहरातील दत्तनगरच्या कॉर्नरला एका भिंतीवर खिळे ठोकून लाकडी फळ्या उभारून तेथे कपडे ठेवण्यात आले आहेत. ज्यांना आपले कपडे गरजूंना द्यायचे असतील अशा व्यक्तींनी या भिंतीवर कपडे आणून ठेवावे अथवा मोबाइलवर संपर्क साधावा म्हणजे गरजूंना कपडे पोहोच करता येतील, असे आवाहन जाकीर हुसेन सामाजिक विकास संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
१ जानेवारी रोजी या संस्थेअंतर्गत जनहित स्वच्छता अभियान टीमच्या मदतीने माणुसकीची भिंत उभारण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी ५० साड्या, ५० ड्रेस व ५० लहान लेकरांचे ड्रेस गरजूंना देण्यात आले. जसेजसे या भिंतीवरील जुने कपडे नेण्यात येतात, तसतसे या ठिकाणी संस्थेकडे जमा झालेले कपडे पुन्हा ठेवले जातात. म्हणजे गरजूंची गैरसोय होणार नाही. आपल्या घरी असलेले जुने कपडे, स्वेटर, लहान लेकरांचे कपडे, चप्पल, बूट, सॉक्स, साडी आदी साहित्य देऊन सहकार्य करावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
या उपक्रमासाठी संस्थेचे जाकीर शेख, राहुल पोतदार, अबू सय्यद, ऋषिकेश पोतदार, लखन लोंढे, आजम सय्यद, रोमान तांबोली, सैफ शेख, विजय माने, कृष्णा पळसे, शाहंजेब कादरी, राम लोंढे, किरण सोळंके, इरफान शेख यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
नागरिकांना आवाहन...
शहर व परिसरातील नागरिकांनी आपल्या घरातील कपडे जाळू नयेत, तसेच फाडू नये आणि फेकू नयेत. जाकीर हुसेन संस्थेशी संपर्क करून आम्हाला माहिती द्यावी. तुमचे कपडे घेऊन जाऊ आणि गरजूंपर्यंत पोहोचवू, असे आवाहन करण्यात आले आहे. नवीन वर्षानिमित्त सुुरू केलेल्या या उपक्रमात आतापर्यंत २५० गरजू या भिंतीवरील कपडे घेऊन गेल्याची माहिती जाकीर हुसेन सामाजिक संस्थेच्या अध्यक्षांनी दिली.