लातूर जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती; रविराजाच्या रौद्ररुपामुळे टंचाईची दाहकता वाढली
By हरी मोकाशे | Published: May 17, 2023 06:53 PM2023-05-17T18:53:15+5:302023-05-17T18:55:12+5:30
वाढत्या उन्हामुळे पाणीटंचाई वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील ८५ गावांत पाण्याची समस्या निर्माण झाली आहे
लातूर : रविराजा दिवसेंदिवस रौद्ररुप धारण करीत आहे. त्यामुळे दुपारच्यावेळी अंगाची लाही- लाही होत आहे. वाढत्या उन्हामुळे जलसाठे आटू लागले आहेत. परिणामी, पाणीटंचाईच्या झळा वाढत आहेत. सध्या जिल्ह्यातील ८५ गावे व वाड्यांना पाणीटंचाईचे चटके जाणवत आहेत. दरम्यान, प्रशासनाकडून अधिग्रहणाद्वारे ६२ गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील मध्यम, लघु प्रकल्पांसह नदी, नाले तुडुंब भरले होते. परिणामी, यंदाच्या उन्हाळ्यात कमी प्रमाणात पाणीटंचाई जाणवेल, असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला. जलसाठे भरल्यामुळे रबी हंगामाचा पेराही वाढून हरभऱ्याचे उत्पादन वाढले. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळाला.
दरम्यान, यंदाच्या मार्चअखेरपासूनच उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाली. एप्रिलपासून तर उष्णतेमुळे जीवाची काहिली होण्यास सुरुवात झाली. वाढत्या उन्हामुळे कमाल तापमान वाढून पारा ४२ अं.से. च्या वर पोहोचला. परिणामी, जलसाठ्यातील पाण्याच्या बाष्पीभवनात वाढ झाली आहे. त्यामुळे जलसाठ्यांतील पाणीसाठा झपाट्याने घटत आहे.
८५ गावांवर पाणीटंचाई ढग...
वाढत्या उन्हामुळे पाणीटंचाई वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील ८५ गावांत पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यात ६२ गावे आणि २३ वाड्यांचा समावेश आहे. सर्वाधिक टंचाई अहमदपूर तालुक्यात जाणवत असून ३२ अशी संख्या आहे. लातूर तालुक्यात ५, औसा- २२, निलंगा- ८, रेणापूर- ३, चाकूर- ३, उदगीर- ३, जळकोट तालुक्यातील ९ गावांत टंचाई आहे.
६३ गावांना अधिग्रहणाचे पाणी...
जिल्ह्यातील ८५ गावांनी अधिग्रहणासाठी प्रस्ताव दाखल केले होते. त्याची तपासणी होऊन ते तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आले होते. मंजुरीनंतर ६२ गावांना अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. त्यात लातूर तालुका- २, औसा- १८, निलंगा- ३, रेणापूर- १, अहमदपूर- २८, चाकूर- २, उदगीर- ३, जळकोट तालुक्यातील ५ गावांना अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे.
अवकाळीमुळे बंधाऱ्यात जलसाठा...
गेल्या महिनाभराच्या कालावधीत सातत्याने अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे औराद शहाजानी परिसरातील तेरणा आणि मांजरा नद्यांना काही प्रमाणात जलसंचय झाला. तसेच कोल्हापुरी आणि उच्चस्तरीय बंधाऱ्यांत ही जलसाठा झाला. अवकाळीमुळे पीक, फळबागांचे नुकसान झाले. मात्र, काही प्रमाणात पाणीसाठा होऊन टंचाई कमी होण्यास मदत झाली आहे.
अद्याप टँकर नाही...
जिल्ह्यातील शिरुर अनंतपाळ आणि देवणी तालुक्यातील एकाही गावास पाणीटंचाई जाणवत नाही. त्यामुळे अधिग्रहणासाठी एकही प्रस्ताव दाखल नाही. तसेच जिल्ह्यात कुठलेही टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु नाही. अधिग्रहणाद्वारे पाणी उपलब्ध करुन देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरु आहे.