जळकाेटातील पशुधनाची चाऱ्यासाठी भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:20 AM2021-05-18T04:20:40+5:302021-05-18T04:20:40+5:30
जळकोट : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी, पशुधनाच्या चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर होत असल्याने भटकंती होत आहे. ...
जळकोट : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी, पशुधनाच्या चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर होत असल्याने भटकंती होत आहे. तसेच साखर कारखान्यांचे बॉयलर थंड झाल्याने आणि लॉकडाऊनमुळे ऊसतोड कामगारांना काम नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कामगार कामाच्या शोधात फिरत आहेत.
जळकोट तालुका हा डोंगर असल्याने तालुक्यात वाडी- तांड्यांची संख्या अधिक आहे. डोंगरी तालुक्यामुळे तालुक्यात केवळ खरीप हंगामच घेतला जातो. परिणामी, साखर कारखाने सुरु झाले की ऊसतोड कामगार उसाच्या फडात दाखल होतात. तालुक्यात पशुधन संख्या ५५ हजार आहे. सध्या उन्हाळा अधिक असल्याने चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. तालुक्यातील शेतकरी शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुधन करतात. त्यामुळे लेकराप्रमाणे पशुधनाची जोपासना केली जाते. दुग्ध व्यवसायातून कुटुंबास हातभार लागतो. येथील लाल कंधारी व देवणी जातीच्या वळूने देश पातळीवर प्रथम क्रमांक मिळविला आहे. मात्र, सध्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. चारा पाण्यासाठी पशुधन शिवारामध्ये भटकंती करीत आहेत. २ ते ४ किमी दूर असलेल्या पाझर, साठवण तलावाच्या ठिकाणी पशुपालकांना पशुधन घेऊन जावे लागत आहे. चारा उपलब्ध होत नसल्याने जनावरे भाकड होत आहेत.
तालुक्यात मजुरांची संख्या २५ हजाराच्या जवळपास आहे. मात्र, त्यातील केवळ हजार ते दीड हजार मजुरांच्या हाताला काम उपलब्ध आहे. उर्वरित मजुर कामाच्या शोधात फिरत आहेत. कोरोनाच्या संकटामुळे मजूर शहरी भागाकडे जाण्यास धजावत नाहीत. गावातच काम शोधत आहेत. अशा परिस्थितीत मग्रारोहयोची कामे सुरु करुन हाताला काम द्यावे, अशी मागणी होत आहे.
हाताला काम, चाऱ्याची व्यवस्था करावी...
पशुधनासाठी चाऱ्याची सुविधा करण्यात यावी. तसेच मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी रोजगार हमी योजनेची कामे सुरु करावेत. काम उपलब्ध होत नसेल तर मजुरांना मासिक ५ हजार रुपये अनुदान द्यावे. त्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे. ज्वारी, गहू, तांदळाचे वाटप करावे, अशी मागणी धरती बचाव संघटनेचे अध्यक्ष हरिभाऊ राठोड, आरपीआयचे तालुकाध्यक्ष विनोद कांबळे, संजय आडे, मजूर संघटनेचे अध्यक्ष खादर लाटवाले, आयुब शेख, उमाकांत सोनकांबळे, रामेश्वर जाधव, रमेश पारे, सुभाष भोसले, अनिल गायकवाड आदींनी केली आहे.