नागरिकांची मजुरीसाठी तर पुढाऱ्यांची मतांसाठी भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:16 AM2021-01-14T04:16:36+5:302021-01-14T04:16:36+5:30
जळकोट हा मजुरांचा डोंगरी तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात प्रशासन दरबारी २५ हजारांवर मजुरांची नोंदणी आहे. मात्र, ...
जळकोट हा मजुरांचा डोंगरी तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात प्रशासन दरबारी २५ हजारांवर मजुरांची नोंदणी आहे. मात्र, तहसील कार्यालयाकडे कामे कमी करून ती वनविभागाकडे देण्यात आली आहेत. मात्र, वनविभाग कोठे आहे, हा संशोधनाचा विषय आहे. पंचायत समिती कार्यालयाकडून घरकूल, शोषखड्डे यांसह अन्य बारा प्रकारच्या कामांवर केवळ १२० मजूरच काम करीत आहेत, तर उर्वरित मजूर मुंबई, पुणे, सोलापूर, निजामाबाद, हैदराबाद या शहरांकडे कामाच्या शाेधात स्थलांतर झाले आहेत.
माळहिप्परगा, रावणकोळा, आतनूर, गव्हाण, नवापूर, चिंचोली, कोहिनूर, शिवाजीनगर तांडा, पोमा तांडा, चतुरा तांडा, फकरूतांडा, भवानीनगर तांडा, चितरंगी तांडा, अग्रवाल तांडा, शेलदरा, वांजरवाडा, केकतसिंदगी, कोहिनूर, उमरगा रेतू, वडगाव, सोनवळा, मंगररुळ, बीड-सांगवी, लाळी खु., लाळी बु. या गावांमध्ये मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जळकोट तालुका खरिपाचा एक हंगामी तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात सर्व शिवार आता उघडा झाला आहे. सोयाबीनच्या राशी झाल्या असून, त्यापाठाेपाठ ज्वारीच्याही राशी झाल्याने शिवार उघडा पडला आहे. यासाठी शासनाने राेजगार हमीची कामे तातडीने सुरू करावीत, अशी मागणी हाेत आहे. तर गाव तिथे मजुरांच्या हाताला काम द्यावे, मुलांचे शिक्षण मोफत करावे, परीक्षा शुल्क माफ करावे, मजुरांचे स्थलांतर थांबवावे, अशीही मागणी हरिभाऊ राठोड, संजय हाडे, सुभाष भोसले, रमेश पारे, नागनाथ शेट्टी, अनिल गायकवाड, संग्राम कदम, माधव होनराव, प्रहार संघटनेचे अध्यक्ष संग्राम गायकवाड यांनी केली आहे.