मूल दत्तक घ्यायचे आहे का ? अशी करावी लागेल कायदेशीर प्रक्रिया !

By हणमंत गायकवाड | Published: December 30, 2023 01:58 PM2023-12-30T13:58:23+5:302023-12-30T13:58:52+5:30

लातूरच्या तीन शिशुगृहातून सहा मुलांना दिले दत्तक; दोन बालकांना परदेशातील मातापित्यांच्या मायेची उब

Want to adopt a child? This legal process has to be done! | मूल दत्तक घ्यायचे आहे का ? अशी करावी लागेल कायदेशीर प्रक्रिया !

मूल दत्तक घ्यायचे आहे का ? अशी करावी लागेल कायदेशीर प्रक्रिया !

लातूर: केंद् व राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत शिशुगृहातील अनाथ मुला,मुलींना दत्तक देण्याची कायदेशीर प्रक्रिया आहे. त्यानुसार लातूर जिल्ह्यातील शासनमान्य तीन शिशुगृहातील सहा बालकांना दत्तक देण्यात आले आहे. त्यातील दोन बालकांना परदेशातील माता-पित्याच्या मायेची ऊब मिळाली आहे.

लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यामध्ये मदर तेरेसा, संधी निकेतन शिशुगृह आणि लातूर शहरांमध्ये श्री गणेश शिशुगृह आहे. या शिशुगृह बालसमितीकडून आलेल्या अनाथ बालकांना दत्त विधान प्रक्रिया करून दत्तक देण्यात आले आहे. गेल्या नऊ महिन्यांमध्ये सहा बालकांना दत्तक देण्यात आले आहे. त्यातील चार बालके देशांतर्गत दत्तक दिली आहेत तर दोन बालके परदेशात गेली आहेत. त्यातील एक इटली आणि दुसरे कॅनडा येथील पालकांनी दत्तक घेतले आहे.

दत्तक घेण्यासाठी असे आहेत नियम व अटी
अधिनियम २०१५ व सुधारित २०२१ दत्तक नियमावली २०२२ नुसार दत्तक विधान प्रक्रिया राबवली जाते. दत्तक विधान प्रक्रिया पूर्ण करूनच भारी इच्छुक माता-पित्यांना बालक दत्तक दिले जाते.

- दत्तक घेणारे माता-पिता शारीरिक, मानसिक, भावनात्मक आणि आर्थिक स्वरूपात सक्षम असणे आवश्यक आहे. पती-पत्नी दोघांचीही सहमती असणे आवश्यक.

- एकल महिला दत्तक घेत असेल तर मुलगा किंवा मुलगी निवडू शकते. एकल पुरुष फक्त बालकाची निवड करू शकतो. बाळ दत्तक घेण्यासाठी बालकाचे वय दोन वर्षाच्या आत असावे.

- दत्तक घेणाऱ्या माता-पिता यांची कमाल वयोमर्यादा संयुक्तरित्या ८५ वर्ष असावे. दत्तक घेणाऱ्या एकल मातेचे कमाल वय ४० वर्षे असावे.

- दोन ते चार वर्ष वयापर्यंतच्या बालकाला दत्तक घ्यायचे असेल तर दत्तक घेणाऱ्या मात्या-पित्यांची कमाल वयोमर्यादा संयुक्तरित्या ९० वर्षांची असावी. दत्तक घेणाऱ्या एकल माता, पित्याची कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे असावी.

आठ वर्षांपर्यंतचे बालक दत्तक घ्यायचे असेल तर.....
चार ते आठ वर्षांपर्यंत चे बालक दत्तक घेण्यासाठी दत्तक घेणाऱ्या माता-पित्याची संयुक्त वयोमर्यादा १०० वर्ष असावी. एकल माता किंवा पित्याची कमाल वयोमर्यादा ५० वर्षे असावी तर बालकांचे वय आठ ते अठरा वर्षांपर्यंत असेल तर दत्तक मातापित्याची कमाल वयोमर्यादा संयुक्तरीत्या ११० वर्ष असावी.

ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करा....
दत्तक घेणाऱ्या एकल माता, पित्याचे कमाल वय ५५ वर्षे असावे. दत्तक विधानासाठी अर्ज दत्तक विधानामार्फत बाळ घेऊ इच्छिणाऱ्या भावी माता, पित्यांनी ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करावा. तसेच दत्तक विधानाबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात संपर्क साधता येईल. 
-  देवदत्त गिरी,महिला व बालविकास अधिकारी, लातूर

टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा
बालकांच्या अनुषंगाने कोणतीही तक्रार असेल किंवा बालक दत्तक घ्यायचे असेल, बालकाविषयी काही माहिती द्यायची असेल तर १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. गेल्या नऊ महिन्यांमध्ये सहा बालकांना दत्तक देण्यात आले आहे त्यांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. 
 - धम्मानंद कांबळे बाल संरक्षण अधिकारी, लातूर

Web Title: Want to adopt a child? This legal process has to be done!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.