मांजरा प्रकल्पातील जिवंत पाणीसाठा संपला; लातूरसह चार शहरांना भेडसावणार समस्या
By हणमंत गायकवाड | Published: May 27, 2024 04:23 PM2024-05-27T16:23:13+5:302024-05-27T16:23:45+5:30
मागील दोन दिवसांपासून मृतसाठ्यातून होतोय पाणीपुरवठा
लातूर : लातूर शहरासह केज, धारूर, अंबाजोगाई, कळंब, लातूर एमआयडीसी आदी मोठ्या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात जिवंत साठा संपलेला आहे. आता मृतसाठ्यातून प्रस्तुत गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शुक्रवारी मांजरा प्रकल्पात ०.१७ टक्के म्हणजे ०.३०४ दलघमी जिवंत पाणीसाठा होता. मात्र आता जिवंत साठा शून्य झालेला आहे. त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे झाले आहे.
लातूर शहरासाठी दररोज मांजरा प्रकल्पातून ५० ते ६० एमएलडी पाणी उचलले जाते. या उचल केलेल्या पाण्यातून पाच दिवसांआड शहरात पाणीपुरवठा होतो. मार्च महिन्यामध्ये आठ दिवसांआड पाणीपुरवठा होत होता. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाणी दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात आला आहे. मृतसाठ्यावर आता पाणीपुरवठा करण्यात येत असल्यामुळे लातूरकरांना जपून पाण्याचा वापर करावा लागणार आहे.
दोन दिवसांपासून मृतसाठ्यातून पुरवठा
शुक्रवारी जिवंत साठ्यातील पाणी उचलले होते. शनिवारी मांजरा प्रकल्प मृतसाठ्यात आला. ४७.१३० दलघमी मृतसाठ्याची क्षमता आहे. आता प्रकल्पात ४६.८२८ दलघमी मृतसाठा आहे. दोन दिवसांत एवढी घट पाण्याची झालेली आहे. प्रकल्पातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. सप्टेंबरअखेरपर्यंत पाणी पुरू शकते. तोपर्यंत पावसाळ्याचे तीन महिने संपलेले असतात. त्यातून नवीन पाण्याची आवक झाली तर टंचाई जाणवणार नाही. सद्य:स्थितीत मात्र मृतसाठ्यातून पाणीपुरवठा सुरू झाला आहे.
पाण्याची उचल आणि बाष्पीभवन वाढले
उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे पाण्याचा वापरही वाढलेला आहे. शिवाय, बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. एक दलघमी पाणी बाष्पीभवनात जात आहे. तर ५० ते ६० एमएलडी पाणी लातूर शहरासाठी उचलले जात आहे. धरणावर अवलंबून असलेल्या सगळ्या गावांना मिळून एक दलघमी पाणी उचलले जाते, अशी घट दररोजची होत असल्याने पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.