लातूर जिल्ह्यात पाण्याचा ठणठणाट; टंचाईग्रस्त गावांचा आकडा चारशेपार!
By हरी मोकाशे | Published: May 17, 2024 04:59 PM2024-05-17T16:59:48+5:302024-05-17T17:01:04+5:30
लातूर जिल्ह्यातील २९० गावांची तहान ३५९ अधिग्रहणांवर
लातूर : रखरखत्या उन्हामुळे जलसाठ्यात आणि भूजल पातळी खालावली आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे चटके आणखीन तीव्र होत आहेत. सध्या जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्या चारशेपार झाली आहे. अधिग्रहणासाठी ६६७ प्रस्ताव दाखल आहेत. त्यापैकी २९० गावांना ३५९ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीएवढेही पर्जन्यमान झाले नाही. परिणामी, जिल्ह्यातील काही गावांना हिवाळ्यापासून पाणीटंचाई जाणवू लागली. प्रकल्पांमध्ये अपेक्षित प्रमाणात जलसाठा झाली नाही. यंदा सर्वाधिक कडक उन्हाळा जाणवत असल्याने जलसाठ्यातील पाणी पातळी आणि भूजल पातळी खालावली आहे. जिल्ह्यातील भूजल पातळी जवळपास दीड मीटरने घटली आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या झळा आणखीन तीव्र झाल्या आहेत. घागरभर पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. टँकर आले की पाणी मिळविण्यासाठी नागरिकांची चढाओढ होत आहे.
शिरुर अनंतपाळात एकही अधिग्रहण नाही...
जिल्ह्यात सर्वाधिक अधिग्रहणे अहमदपूर तालुक्यात आहेत. ६४ गावांना ६४ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. लातूर- ५६, औसा - ५७, निलंगा- ५०, रेणापूर- ५८, चाकूर- २३, उदगीर- २९, देवणी- ६, जळकोट तालुक्यात १६ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील शिरुर अनंतपाळ तालुक्यात अद्यापह एकही अधिग्रहण करण्यात आले नाही. सध्या जिल्ह्यातील २९० गावांना ३५९ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
टँकरसाठी ५७ गावांचे प्रस्ताव...
गावात पिण्यासाठीही पाणी मिळत नसल्याने जिल्ह्यातील ३७ गावे आणि २० वाड्या अशा एकूण ५७ गावांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर केला आहे. त्यापैकी २२ गावे आणि ५ वाड्या अशा एकूण २७ गावांना २६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे.
औसा तालुक्यात भीषण पाणीटंचाई...
औसा तालुक्यात सर्वात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे तेथील १० गावांनी टँकरची मागणी केली आहे. त्यापैकी लामजना, खरोसा, माेगरगा, टाका, तांबरवाडी/ राजेवाडी, कार्ला, शिवणी लखवाडी, रामेगाव, मासुर्डी या गावांना टँकर मंजूर करण्यात आले आहेत. अहमदपूर तालुक्यातील टेंभूर्णी, ब्रह्मवाडी, हसर्णी, जळकोट तालुक्यातील शिवाजीनगर तांडा/ वाघमारी तांडा, येलदरा, लातूर तालुक्यातील बोरगाव, साखरा, चिंचोली ब., चिखुर्डा, गुंफावाडी, रामेगाव, रुई, दिंडेगाव, रेणापुरातील सेलू खु., उदगीर तालुक्यातील डोंगरशेळकी, महादेववाडी या गावांना टँकरने पाणीपुरवठ्यास मंजुरी देण्यात आली आहे.
अहमदपूर तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाई...
लातूर - ४८
औसा - ४६
निलंगा - ६८
रेणापूर - ४८
अहमदपूर - ९९
चाकूर - ३३
शिरुर अनं. - १२
उदगीर - ४०
देवणी - २०
जळकोट - २०
एकूण - ४३४