पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर; लातूर जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांनी ओलांडली शंभरी

By हरी मोकाशे | Published: February 21, 2024 05:28 PM2024-02-21T17:28:03+5:302024-02-21T17:28:39+5:30

लातूर जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पासह लघु प्रकल्पात अपेक्षित प्रमाणात जलसाठा झाला नाही.

Water problem is getting serious day by day; In Latur district, the water shortage-affected villages have crossed the hundred mark | पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर; लातूर जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांनी ओलांडली शंभरी

पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर; लातूर जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांनी ओलांडली शंभरी

लातूर : फेब्रुवारीपासूच उन्हाची तीव्रता अधिक जाणवू लागली आहे. त्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न आणखीन वाढू लागला आहे. सध्या जिल्ह्यातील ११३ गावे, वाड्या तहानेने व्याकूळ झाली असून अधिग्रहणासाठी १४५ प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यापैकी केवळ १२ गावांना १४ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परिणामी, उर्वरित गावांत पाण्याची चिंता वाढली आहे.

गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीएवढेही पर्जन्यमान झाले नाही. अल्प पाऊस झाल्याने मांजरा, तेरणा, तिरु या प्रमुख नद्यांसह इतर नद्या, ओढे- नाले वाहिले नाहीत. जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पासह लघु प्रकल्पात अपेक्षित प्रमाणात जलसाठा झाला नाही. परिणामी, भूजलपातळीत वाढ झाली नाही. उलट गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत भूजलपातळीत दीड मीटरने घट झाली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. दरम्यान, यंदा लवकरच पाणीटंचाईची समस्या उद्भवणार हे गृहित धरुन जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणार्थ आराखडा तयार केला. त्याचबरोबर जलसाठ्यासाठी पाणी पिण्यासाठी आरक्षित केले आहे.

अहमदपूर तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाई...
तालुका - टंचाईग्रस्त गावे

लातूर - १५
औसा - २३
निलंगा - १०
रेणापूर - ६
अहमदपूर - ३६
शिरुर अनं. - ०२
उदगीर - ०३
देवणी - ०१
जळकोट - ०१
एकूण - ९७

अधिग्रहणासाठी एकूण १४५ प्रस्ताव...
जिल्ह्यात नोव्हेंबर अखेरीसपासून पाणीटंचाई जाणवू लागली आहे. दरम्यान, सध्या जिल्ह्यातील ९७ गावे आणि १६ वाड्यांनी अधिग्रहणासाठी एकूण १४५ प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर केले आहेत. त्यानंतर पाहणी करुन पंचायत समितीने चार गावांचे ११ प्रस्ताव वगळले आहेत.

१४ अधिग्रहणाद्वारे पाणी...
प्रत्यक्ष पाहणीनंतर पंचायत समितीने ५९ गावे आणि ७ वाड्यांचे अधिग्रहणाचे एकूण ८१ प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे सादर केले आहेत. त्यापैकी ११ गावे आणि एका वाडीचे एकूण १४ प्रस्ताव मंजूर करुन तिथे अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. अद्यापही जवळपास १२० प्रस्ताव प्रलंबित आहेत.

टेंभूर्णी गावास टँकर मंजूर...
वाढत्या पाणीटंचाईमुळे नागरिकांची भटकंती होत आहे. जिल्ह्यातील सात गावांच्या एक किमीच्या परिसरात पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने तेथील ग्रामपंचायतींनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी करीत प्रस्ताव दाखल केला आहे. त्यात औसा तालुक्यातील लामजना, खरोसा, टाका, अहमदपूर तालुक्यातील टेंभूर्णी, फुलसेवाडी, जळकोट तालुक्यातील येलदरा आणि लातूर तालुक्यातील चिंचोली ब. या गावांचा समावेश आहे. त्यापैकी टेंभूर्णी गावासाठी टँकर मंजूर करण्यात आले आहे.

प्रत्यक्ष पाहणीनंतर प्रस्तावास मंजुरी...
अधिग्रहणासाठी प्रस्ताव आल्यानंतर पंचायत समिती आणि तहसील कार्यालयामार्फत प्रत्यक्ष पाहणी करण्यात येते. त्यानंतर प्रस्तावास मंजुरी देण्यात येत आहे. सध्या १२ गावांसाठी १४ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. तसेच टेंभूर्णी गावास टँकरने पाणीपुरवठ्यास मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे व पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.

Web Title: Water problem is getting serious day by day; In Latur district, the water shortage-affected villages have crossed the hundred mark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.