पाण्याचा प्रश्न गंभीर! जळकोटमधील १२ साठवण तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली
By संदीप शिंदे | Published: September 1, 2023 05:38 PM2023-09-01T17:38:38+5:302023-09-01T17:39:09+5:30
चार तलावांत पाणीसाठा शून्य : तालुक्यातील पाण्याचा प्रश्न गंभीर
जळकोट : तालुक्यात १६ साठवण तलाव असून, यातील १२ तलावांत पाणीसाठा जोत्याखाली आला आहे. तर चार तलावांत शून्य टक्के पाणीसाठा आहे. यामध्ये ढोरसांगवी, हावरगा, जंगमवाडी, सोनवळा साठवण तलावांचा समावेश आहे. दरम्यान, तालुक्यात मागील महिनाभरापासून पाऊस नसल्याने पिके वाळून चालली असून, पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.
तालुक्यात महिनाभराच्या पावसाच्या विश्रांतीमुळे व तीव्र उन्हामुळे पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. १२ साठवण तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, प्रशासनाने हा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही तर जळकोट तालुक्यात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होणार आहे. तालुक्यातील सोनवळा, जंगमवाडी, ढोरसांगवी, हावरगाव तलावांत शून्य टक्के, हळद वाढवणा ४० टक्के, डोंगरगाव ५९ टक्के, माळहिप्परगा १०० टक्के, रावणकोळा ९४ टक्के, सिंदगी तलावात ३८ टक्के, चेरा क्रमांक एक १८ टक्के, चेरा क्रमांक दोन १८ टक्के, शेलदरा तलावात १० टक्के, वांजरवाडा १० टक्के, धोंडवाडी १२ टक्के, गुत्ती क्रमांक एक १६ टक्के, गुत्ती क्रमांक दोन तलावांत १४ टक्के असा जलसाठा असल्याची माहिती लघुपाटबंधारे विभागाचे उपअभियंता अरुण त्रिपाठी यांनी दिली. तलावांमध्ये कमी पाणीसाठा असल्याने पिण्यासह पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. तालुक्यातील सर्व साठवण तलावांत केवळ २० टक्के पाणीसाठा असून, सप्टेंबरमध्ये मोठा पाऊस नाही झाला तर पाण्याची परिस्थिती गंभीर होणार आहे. याबाबत अनेक गावांतील नागरिकांनी पाणी आरक्षित करण्याची मागणी केली आहे.
पशुधनाला पाणी कोठून आणणार?
तालुक्यात पशुधनाची संख्या ५० हजारांवर आहे. यामध्ये दुग्धव्यवसाय करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. सध्या सर्वच प्रकल्पांत केवळ २० टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पाऊस न पडल्यास पशुधनाला पाणी कोठून आणणार? असा प्रश्न आहे. पिण्याच्या पाण्यासाठी तत्काळ उपायोजना राबविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. प्राध्यान्याने पिण्याचे पाणी, शेती आणि त्यानंतर उद्योगासाठी पाण्यास प्राधान्य देणे आवश्यक आहे. महिनाभरापासून पाऊस नाही. त्यात तीव्र ऊन पडत असल्याने पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा...
तालुक्यात जूनच्या सुरुवातीपासूनच पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावलेली नाही. केवळ रावणकोळा, मरसांगवी, अतनूर, घोणसी परिसरात जुलै महिन्यात मोठा पाऊस झाला होता. त्यामुळे शेतातील पिके, माती वाहून गेली होती. मात्र, तेव्हापासून आतापर्यंत पाऊसच झालेला नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे प्रकल्पांतील पाणीसाठ्यातही घट होत असून, पिके वाळून चालली आहेत. त्यामुळे प्रशासनाने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.